दुसऱ्या दिवशीही बेळगावची विमानसेवा कोलमडली
दिल्लीसह सायंकाळची बेंगळूर फेरी रद्द
बेळगाव : इंडिगो कंपनीच्या देशभरातील विमान सेवेवर परिणाम जाणवत आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे बेळगावच्या विमानसेवेलाही फटका बसला. शुक्रवारी दिल्ली-बेळगाव व सायंकाळची बेंगळूर-बेळगाव विमानफेरी रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. सलग दुसऱ्या दिवशी ही परिस्थिती जाणवल्याने विमान प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळख असणाऱ्या इंडिगोची सेवा गुरुवारी पुरती कोलमडली. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय 380 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्याचे समोर आले. याचा परिणाम बेळगाववरही जाणवला. शुक्रवारी दिल्ली-बेळगाव विमानफेरी रद्द करण्यात आली. तसेच बेंगळूर-बेळगाव सायंकाळची फेरीही रद्द झाल्याने प्रवाशांचे आतोनात हाल झाले.
हैदराबाद विमानफेरी विलंबाने
बेळगावमधून इंडिगोतर्फे दिल्ली, बेंगळूर येथे दोन फेऱ्या तर हैदराबाद अशा एकूण चार सेवा दिल्या जातात. यापैकी सकाळची बेंगळूर-बेळगाव व हैदराबाद-बेळगाव या दोन विमानफेऱ्या शुक्रवारी सुरू होत्या. परंतु या विमानफेऱ्याही विलंबाने सुरू असल्याने विमानतळावर गोंधळ पाहायला मिळाला. नागरिकांचे सर्वच वेळापत्रक कोलमडल्याने आपली नाराजी त्यांनी व्यक्त केली.
इंडिगो कंपनीच्या काही सेवा सुरळीत
इंडिगो कंपनीच्या काही सेवा सुरळीत सुरू होत्या. तर काही सेवा रद्द करण्यात आल्या. शुक्रवारी दिल्ली व सायंकाळची बेंगळूर विमानफेरी रद्द झाली. सकाळची बेंगळूर व हैदराबाद विमानफेरी विलंबाने सुरू ठेवण्यात आली होती.
-त्यागराजन(बेळगाव विमानतळ संचालक)