कर्जापायी महिलेवर बलात्कार करणाऱ्या उज्ज्वलनगरच्या युवकाला अटक
बेळगाव : अडचणीच्यावेळी घेतलेल्या 20 हजार रुपये उसन्या पैशांच्या बदल्यात एका महिलेवर सातत्याने बलात्कार करणाऱ्या उज्ज्वलनगर येथील युवकाला माळमारुती पोलिसांनी अटक केली. युनुस अल्लाबक्ष बागवान, राहणार उज्ज्वलनगर असे त्याचे नाव आहे. बेळगाव शहरातच राहणाऱ्या त्याच्याच नात्यातील एका महिलेने कौटुंबिक अडचणीसाठी 20 हजार रुपये घेतले होते. ही रक्कम परतफेड करता आली नाही. यामुळे ‘पैसे परत देऊ नकोस, त्याच्या बदल्यात आपल्याबरोबर मैत्री ठेव’, असे युनुसने महिलेला सांगितले होते.
मे 2019 मध्ये उज्ज्वलनगर येथील आपल्या घरी बोलावून या महिलेवर त्याने बळजबरी केली होती. त्यानंतर सातत्याने असे प्रकार सुरूच राहिले. लैंगिक संबंधाच्या वेळी त्याने एक व्हिडिओ काढून ठेवला होता. अलीकडे या महिलेने युनुसशी संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे ‘आपल्याजवळील व्हिडिओ तुझ्या पतीला पाठवतो’, असे धमकावले होते. 3 नोव्हेंबर रोजी संबंधित महिलेने माळमारुती पोलीस स्थानकात यासंबंधी फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी युनुसला अटक करून 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करून त्याला न्यायालयासमोर हजर केले.