For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टोळक्याच्या हल्ल्यात शिवाजीनगरचा तरुण गंभीर जखमी

12:42 PM Aug 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
टोळक्याच्या हल्ल्यात शिवाजीनगरचा तरुण गंभीर जखमी
Advertisement

हल्ला करणारे तरुण मुत्यानट्टी, भुतरामहट्टी परिसरातील

Advertisement

बेळगाव : शिवाजीनगर येथील एका तरुणावर हल्ला करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेनंतर परिसरात काहीकाळ धावपळ उडाली होती. कुणाल राजेंद्र लोहार (वय 21) राहणार शिवाजीनगर असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी सिव्हिल  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून पाईपने त्याच्या डोक्यावर व पाठीवर हल्ला करण्यात आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसीयु विभागात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती समजताच मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.

बाराहून अधिक जणांचा समावेश असलेल्या एका टोळक्याने हे कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे. जखमी कुणाल हा उद्यमबागमध्ये काम करतो. गुरुवार दि. 7 ऑगस्ट रोजी दुपारी कामावरून घरी जाताना शिवाजीनगर परिसरात त्याला अडवून त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. स्थानिक लोक जमा होण्याआधीच हल्ला करणाऱ्या तरुणांनी तेथून पळ काढला. मार्केट पोलिसांनी यापैकी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी किल्ला परिसरात कुणाल व आणखी एका तरुणाचे भांडण झाले होते. या भांडणाचे पर्यवसान गुरुवारी हल्ल्यात झाले आहे. हल्ला करणारे तरुण मुत्यानट्टी, भुतरामहट्टी परिसरातील असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मार्केट पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.