लोणीच्या युवकाचा अपघातात मृत्यू
वडूज :
लोणी (ता. खटाव) येथील सूरज भानुदास जाधव (वय 25) या युवकाचे अपघाती निधन झाले. मयत सूरज हे रात्री 9.00 वा. चौकीचा आंबा (भोसरे) येथून लोणी येथे दुचाकी गाडीवरून चुलत सासऱ्यांना घेऊन घरी येत होते. भोसरे गावच्या हद्दीत सोनार माळ टेकाजवळ लोणी येथून बॉयलर कोंबड्या घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीने जोरदार धडक दिल्याने जाधव गंभीर जखमी झाले. वडूज येथे ग्रामीण रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. तर त्यांच्या पाठीमागे दुचाकीवर बसलेले चुलत सासरे नितीन भाऊसाहेब पवार (वय : 32) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर कराड येथील कृष्णा धर्मादाय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताबाबत सुनिल कैलास जाधव (रा. लोणी) यांनी वडूज पोलीस ठाण्यात खबर दिली असून पुढील तपासासाठी सदर प्रकरण औंध पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मयत सूरज जाधव यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, आई, वडिल व 3 विवाहित बहिणी असा परिवार आहे. एकुलता, कष्टाळू, कर्तबगार मुलाचे अपघाती निधन झाल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
..