टेम्पोच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू
कुडाळ कविलकट्टा येथील घटना ;टेम्पो चालक होता दारूच्या नशेत
कुडाळ - कुडाळहून बावच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोने पादचारी लालसाब दौलसाब खाणापूर (४९, कुडाळ - कविलकट्टा, जमदारवाडी ) याना मागून जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर टेम्पो चालक दारूच्या नशेत होता. ही घटना शनिवारी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास कुडाळ - कविलकट्टा, जमादारवाडी तिठा येथे घडली. नंतर टेम्पो तेथील वीज खांबाला आढळल्याने सदर खांब मोडून वाहिन्या तुटल्या व वरील युनिट खाली आले.या टेम्पोने येथील एक खासगी संरक्षक भिंतीही उडविली. पांडुरंग शिवाजी खोत (40, बेळगाव - कर्नाटक) असे या टेम्पो चालकाचे नाव असून अपघातानंतर तो तेथे लपून बसला होता.परंतु नागरिकांनी त्याला पकडून कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, याबाबतची फिर्याद मोहम्मदसुफियान दस्तगीर पटेल सासाबाल (रा. मज्जिद मोहल्ला ,कुडाळ ) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर टेम्पो चालक पांडुरंग खोत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. काल रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास टेम्पो चालक पांडुरंग खोत दारूच्या नशेत आपल्या ताब्यातील टाटा कंपनीचा झेनॉन टेम्पो घेऊन कुडाळहून बावच्या दिशेने भरधाव वेगात जात होता.तेथून चालत जात असलेले लालसाब दौलसाब खाणापूर यांना मागून त्या टेम्पोची जोराची धडक दिली. नंतर टेम्पो तेथील वीज खांबालाही जोरात आदळला.यात सदर खांब मोडून विद्युत वाहिन्या व खांबावरील युनिट खाली आले. रस्त्याच्या कडेचा विद्युत पुरवठा खंडित झाला. या घटने दरम्यान तेथे असलेले मोहम्मदसुफियान दस्तगीर पटेल सासाबाल ,अब्दुल रज्जाक, अरमान जमादार व अय्याज आडलकर यांनी तेथे धाव घेतली. टेम्पोच्या पुढील जागा खाली अडकलेल्या स्थितीत असलेले लालसाब खाणापूर यांना त्यांनी बाहेर काढले.मात्र,खाणापूर यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान, टेम्पो चालक पांडुरंग खोत याने काळोखाचा फायदा घेत टेम्पोतून उतरुन तेथून पळ काढला. कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.टेम्पो चालक खोत त्याठिकाणी भीतीच्या आडोशाला लपून बसला होता.नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.सदर चालक दारूच्या सेवन करून दारूच्या नशेत टेम्पो चालवित असताना ही घटना घडली. कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील, उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे यांनी घटनास्थळी भेट दिली.हवालदार रत्नकांत तिवरेकर, महेश भोई,सचिन गवस यांनी घटनास्थळी पंचनामा केला. लालसाब खाणापूर कुडाळ येथे गेले 30 ते 35 वर्षे लेबरचे काम करायचे.