मनी लॉन्ड्रिंगच्या धमकीने ज्येष्ठ नागरिकाला 97 लाखांचा गंडा
सावंतवाडीतील घटना; दोन संशयीतांना अटक
सावंतवाडी / प्रतिनिधी
मुंबई क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे भासवून एका अज्ञात सायबर गुन्हेगाराने एका ज्येष्ठ नागरिकाला मनी लॉन्ड्रीच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत तब्बल 97 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना 18 ते 26 नोव्हेंबर 2025 या कालावधीत घडली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पिढीत आणि सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर अवघ्या तीन ते चार तासातच सायबर यंत्रणांचा वापर करून फसवणुकीच्या रकमेपैकी सुमारे नऊ लाख रुपये गोठवण्यात सायबर पोलिसांना यश आले. याप्रकरणी पोलिसांनी विष्णू बांदेकर 57 रा.अंधेरी, समशेर खान रा. मालवण या दोघांना अटक केली असून सोमवार पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात अज्ञात संशयिताने पीडित ज्येष्ठ नागरिकाला व्हाट्सअप व्हिडिओ कॉल केले. मुंबई क्राईम ब्रँच अधिकारी असल्याची बतावणी करत, तुमच्या खात्यातून 25 लाखांचा व्यवहार मनी लॉन्ड्रीशी संबंधित आहे. त्वरित मुंबईत या किंवा आम्ही सांगतो तशी ऑनलाइन चौकशी करा, अशा धमक्या देऊन त्यांना मानसिक दडपण आणले. कायदेशीर अडचणीत सापडण्याची भीती मनात आल्याने सदर पीडिताने आपली फिक्स डिपॉझिट, म्युचअल फंड, आणि शेअर्समधील सुमारे 97 लाख रुपये आरटीजीएस प्रणालीद्वारे संशयिताच्या बँक खात्यावर ऑनलाईन ट्रान्सफर केले आणि ते सायबर शिकारीचे बळी ठरले.