For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मासा चावल्याने युवकाचा उपचारावेळी मृत्यू

12:08 PM Oct 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
मासा चावल्याने युवकाचा उपचारावेळी मृत्यू
Advertisement

कारवार येथे समुद्रामध्ये मासे पकडताना घडली घटना : मच्छीमारी बांधवांकडून सरकारी वैद्यकीय महाविद्यालयासमोर निदर्शने

Advertisement

कारवार : माशाच्या चाव्यामुळे मच्छीमारी समाजातील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या दुर्मिळ घटनेची नोंद येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी सकाळी 5 वाजता घडली आहे. माशाच्या चाव्याने मृत्यू होण्याची ही कर्नाटकातीला पहिलीच घटना मानली जात आहे. संपूर्ण जगात 1978 पासून आजअखेर अकरा जणांचा मशांच्या चाव्याने मृत्यू झाला आहे, अशी माहिती तज्ञांनी दिली आहे. या घटनेनंतर मयत युवकाच्या कुटुंबीयांनी, नातेवाईकांनी आणि शेकडो बांधवांनी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली आणि महाविद्यालयातील गलथान कारभाराविरोधात निदर्शने केली. यावेळी उपस्थित मच्छीमारी बांधवांनी युवकाच्या मृत्यूला महाविद्यालयातील चुकीच्या उपचार आणि अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा गंभीर आरोप केला.

मोठा पोलीस फौजफाटा तैनात 

Advertisement

मच्छीमारी बांधवांच्या तीव्र निदर्शनामुळे महाविद्यालय आवारात काही काळ तणावाचे वातावरण  होते. खबरदारीचा उपाय म्हणून महाविद्यालयाच्या आवारात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच कारवार-अंकोलाचे आमदार सतीश कृष्णा सैल, कारवार जिल्हा विधानपरिषद सदस्य गणपती उळवेकर, कारवारचे तहसीलदार नरोन्हा यांनी महाविद्यालयाकडे धाव घेतली. यावेळी आमदार सतीश सैल आणि गणपती उळवेकर यांनी संतप्त जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जीव गमविलेल्या युवकाचे नाव अक्षय अनिल माजाळीकर (वय 24, रा. दांडेबाग, ता. कारवार) असे आहे.

या दुर्मीळ घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, मंगळवार दि. 14 रोजी होडीतून मासेमारीसाठी अरबी समुद्रात उतरलेला अक्षय होडीत बसून मासेमारी करीत होता. त्यावेळी उडत आलेल्या 8 ते 10 लांबीच्या कांडे (स्थानिक आक्षेन टोळी) जातीच्या व टोकदार टोच असलेल्या माशाने, अक्षयच्या पोटाचा चावा घेतला. अक्षयला वेदना असह्या झाल्याने तातडीने त्याला उपचारासाठी येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. पहिल्यांदा त्याच्यावर तातडीने उपचार केले नाहीत. माशाच्या चाव्याने त्याच्या आतड्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्याच्या पोटाचा एक्सरे काढून जखमेच्या ठिकाणी स्टीचीस घालण्यात आल्या. नंतर डॉक्टरांनी थातूरमातूर कारणे सांगितले. तरी सुद्धा तो पोटात वेदना होत असल्याने बुधवारी रुग्णालयातच राहिला. पुढे त्याची प्रकृती खालावली आणि गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.

डॉक्टरवर गंभीर आरोप 

अक्षयच्या याच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीय, नातेवाईकांनी आणि शेकडो मच्छीमारी बांधवांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णाचे सीटी स्कॅन का करण्यात आले नाही?, ऑपरेशन करून पोटातील माशाचा काटा बाहेर का काढला नाही?, उपचाराला उशीर का केला?, रुग्णाला उपचारासाठी अन्यत्र हलविण्याची सूचना किंवा शिफारस का करण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित केले. घटनास्थळी आमदार सैल आणि उळवेकर यांनी संतप्त नागरिकांना समजाविण्याचा प्रयत्न केला आणि जिल्हा प्रशासनाला काही सूचना केल्या. यावेळी मयताच्या कुटुंबीयांना 10 लाख रु. भरपाई देण्याची मागणी केली. प्रकरणाची कसून चौकशी तातडीने करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संतप्त नागरिकांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर येथील रुग्णावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्या खासगी क्लिनीकमध्ये उपचार करून घेणाऱ्या रुग्णांची अधिक काळजी घेतात. कारण जिल्हा रुग्णालयांत उपचार करून घेणाऱ्या रुग्णांकडून त्यांना पैसे मिळत नाहीत तर प्रायव्हेट क्लिनीकमध्ये उपचार करून घेणाऱ्या रुग्णाकडून हजारो रुपये मिळतात, असे अनेक आरोप डॉक्टरवर करण्यात आले. एकंदरीत मयत युवकाऐवजी सरकारी महाविद्यालयातील गलथान कारभाराची अधिक चर्चा सुरू होती.

Advertisement
Tags :

.