For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निलजीत घरावरून पडून तरुणाचा बळी

06:59 AM Jan 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
निलजीत घरावरून पडून तरुणाचा बळी
Advertisement

नशेत दोघा भावांचे भांडण : दुसराही पडून गंभीर जखमी : परिसरात एकच खळबळ  

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

गांजासाठी दोघा सख्ख्या भावांमध्ये झालेल्या भांडणानंतर घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून एका भावाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री निलजी (ता. बेळगाव) येथे ही घटना घडली असून मारिहाळ पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.

Advertisement

सुशांत सुभाष पाटील (वय 20) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मोठा भाऊ ओंकार सुभाष पाटील (वय 23) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून गांजासह अमलीपदार्थांच्या नशेमुळे तरुणाई कोणत्या थराला पोहोचली आहे, हे सामोरे आले आहे.

शुक्रवारी मध्यरात्री 12.30 नंतर दत्तात्रय गल्ली, निलजी येथे ही घटना घडली आहे. घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या सुशांत व ओंकार या दोघा जणांना सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. पहाटे उपचाराचा उपयोग न होता सुशांतचा मृत्यू झाला. आई कांचन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला

आहे.प्राथमिक माहितीनुसार सुशांतच्या मृत्यूला मोठा भाऊ ओंकार हाच कारणीभूत असल्याचे सामोरे आले असून ओंकारविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, मारिहाळचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नायक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सुशांत व ओंकार या दोघा जणांना दारू व गांजाचे व्यसन जडले होते. नशेत दोघे अधूनमधून भांडत होते. शुक्रवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास ओंकारने सुशांतला टेरेसवर नेले. या दोघा जणांमध्ये भांडण जुंपले. भांडणानंतर दोघेही दुसऱ्या मजल्यावरून खाली पडले. या घटनेत दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. ओंकारवर सध्या खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून सुशांतचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

मुलांवर लक्ष ठेवले तरच नशेचा व्यवहार रोखता येणार

बेळगावसह ग्रामीण भागातही गांजा, पन्नी आदी अमलीपदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणाईची संख्या वाढली आहे. गांजाच्या नशेत अनेकजण गुन्हे करू लागले आहेत. निलजी परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री व वापर सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. गांजाची विक्री थोपविण्यासाठी अधूनमधून पोलीस दलाकडून कारवाई केली जाते.

Advertisement
Tags :

.