युवा आघाडीचा आज भव्य मेळावा
खासदार डॉ. अमोल कोल्हे, रोहित आर. आर. पाटील यांची उपस्थिती, हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
युवकांनी सीमालढ्यात अधिक सक्रिय व्हावे यासाठी तालुका म. ए. समिती व युवा आघाडीतर्फे रविवार दि. 12 रोजी दुपारी 3 वाजता महात्मा फुले रोड शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवनमध्ये भव्य युवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील खासदार डॉ. अमोल कोल्हे, युवा आमदार रोहित आर. आर. पाटील उपस्थित राहून तरुणांना सीमालढ्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर येथील प्रा. मधुकर पाटील युवकांचे प्रबोधन करणार आहेत.
मागील 69 वर्षांपासून सीमालढा सुरू आहे. कर्नाटकी जुलमी अन्याय, अत्याचार सहन करून हा प्रश्न जिवंत ठेवला आहे. हा लढा आता युवकांनी खांद्यावर घ्यावा, यासाठी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा दिनाचे औचित्य साधून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सीमाप्रश्नाबाबतची तळमळ आणि ताकद दाखवून द्यावी, असे आवाहनही युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणेकर यांनी केले आहे.
तालुका म. ए. समिती आणि युवा आघाडीतर्फे या मेळाव्याबाबत गावोगावी जनजागृती करण्यात आली आहे. दरम्यान मराठी भाषिक युवकांनी या मेळाव्याला जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवाय महाराष्ट्रातील खासदार डॉ. अमोल कोल्हे व युवा आमदार रोहित आर. आर. पाटील यांचे आकर्षण राहणार आहे.
सीमाभागातील तरुणांबरोबर चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.