पोल्ट्री फार्म स्वच्छ करतानाविजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
बंबरगा येथील घटनेने परिसरात हळहळ
बेळगाव : पाणी मारून पोल्ट्री फार्म स्वच्छ करताना विजेचा धक्का बसून रामनगर, कंग्राळी खुर्द येथील एका युवकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी बंबरगा, ता. बेळगाव येथे ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अमोल विवेकानंद जाधव (वय 44) राहणार रामनगर, कंग्राळी खुर्द असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. अमोलने बंबरगाजवळ एक पोल्ट्री फार्म चालवण्यासाठी घेतला होता. शुक्रवारी दुपारी तो आपल्या पत्नीसह पोल्ट्री फार्मवर पोहोचला. एक एचपीची मोटर सुरू करून पाणी मारून स्वच्छता करताना विजेचा धक्का बसला.
या घटनेनंतर अमोलच्या पत्नीने तातडीने त्याला स्थानिकांच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविले. सिव्हिलला पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शुक्रवारी दुपारी साडेतीन ते पावणेचार यावेळेत ही घटना घडली असून शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.