एआय ब्लॅकमेलमुळे युवकाची आत्महत्या
वृत्तसंस्था / फरीदाबाद
बहिणींची नको त्या अवस्थेतील बनावट छायाचित्रे दाखवून ब्लॅकमेल करण्यात आल्याने एका 19 वर्षाच्या महाविद्यालयीन युवकाने आत्महत्या केल्याची घटना हरियाणातील फरीदाबाद येथे घडली आहे. या प्रकरणी तक्रार सादर करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणातल्या आरोपीने या युवकाकडे 20 हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास त्याच्या 3 बहिणींची छायाचित्रे सोशल मिडियावरुन प्रसारित केली जातील, अशी धमकीही त्याने दिली होती, अशी माहिती हरियाणा पोलिसांकडून देण्यात आली आहे.
ही घटना फरीदाबाद शहराच्या एका वस्तीत घडली आहे. आरोपीने या युवकाला त्याच्या तीन बहिणींची नको त्या अवस्थेतील छायाचित्रे आणि व्हिडीओ दाखविले होते. मात्र, ही छायाचित्रे आणि व्हिडीओ हे खरे नसून कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग करुन बनविलेले होते. या युवकाला ती छायाचित्रे आणि व्हिडीओ खरे वाटल्याने त्याला मोठाच धक्का बसला. त्याच्याकडे देण्यासाठी पैसेही नव्हते. त्यामुळे त्याने आत्महत्या केली. राहुल भारती हे या युवकाचे नाव आहे.
दोन आठवड्यांपूर्वी प्रारंभ
त्याला ब्लॅकमेल करुन धमकी देण्यास साधारणत: दोन आठवड्यांपूर्वी प्रारंभ करण्यात आला होता. या युवकाला कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने असे बनावट व्हिडीओ आणि छायाचित्रे बनविता येतात, याची माहिती नव्हती. त्यामुळे त्याचा या व्हिडीओंवर विश्वास बसला. कृत्रिम बुद्धामत्ता किंवा एआय संबंधी अज्ञान असल्याने त्याला हकनाक जीव गमवाला लागला असल्याचे दिसून येते.
शनिवारी आत्महत्या
गेल्या शनिवारी या युवकाने त्याच्या खोलीत विषारी पदार्थ पिऊन आत्महत्या केली. हा प्रकार त्याच्या सहाध्यायांच्या लक्षात आल्यानंतर त्याला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारांचा कोणताही उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची आता सखोल चौकशी करण्यात येत असून एआय किंवा कृत्रिम बुद्धीमत्ता प्रकरणी युवकांचे आणि सर्वसामान्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. अन्यथा अज्ञानापोटी हानी होऊ शकते, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.