कपिलेश्वर रोडवरील तरुणाची गळफासाने आत्महत्या
बेळगाव : कपिलेश्वर रोडवरील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून खडेबाजार पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. मोबाईलमध्ये डेथनोट लिहून ठेवून या तरुणाने आपले जीवन संपविले आहे. सिद्धांत रामा पुजारी (वय 27) असे त्या तरुणाचे नाव आहे. मंगळवार दि. 23 सप्टेंबरच्या रात्री 9 ते बुधवारी सकाळी 10.30 यावेळेत फॅनला गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपविले आहे. रामा पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेहाजवळ एक पत्र सापडले आहे. या पत्रात आपल्या मोबाईलमध्ये डेथनोट लिहिलेली आहे. त्याचा पासवर्ड असा आहे, असे सांगत पासवर्ड लिहून ठेवला होता. त्या पासवर्डचा वापर करून पाहिले असता मोबाईलमध्ये डेथनोट आढळून आली. सिद्धांतचे वडील रामा पुजारी कपिलेश्वर मंदिरात पुजारी होते. आपल्यावर खोटी प्रकरणे दाखल करण्यात आली. तेथून बाहेर काढण्यात आले. असे सांगतानाच आईवडील व कुटुंबीयांनाही त्या तरुणाने आपल्यासाठी रडत बसू नका, असा सल्ला दिला आहे. पोलिसांनी डेथनोट ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.