युवा आशिया चषक स्पर्धेचा धमाका आजपासून
भारत-युएई सलामीची लढत : वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे नजरा
वृत्तसंस्था/दुबई
युवा आशिया कप स्पर्धेला आजपासून (12 डिसेंबर) सुरुवात होत आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा सामना युएईशी होईल, तर दुसऱ्या सामन्यात मलेशिया-पाकिस्तान आमनेसामने येणार आहे. दोन्ही सामने दुबईमध्ये पार पडणार आहेत. स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला असून त्याच्या कामगिरीकडे चाहत्यांचा नजरा असतील.
यंदाच्या युवा आशिया चषक स्पर्धेत भारत, पाकिस्तानसह आठ संघाचा सहभाग असणार आहे. भारतीय संघ आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वाखाली स्पर्धेत उतरणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची पूर्वीच घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय संघ यजमान युएई संघाविरूद्ध सामन्याने स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरूवात करेल. यानंतर 14 रोजी टीम इंडिया पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळेल तर गटातील शेवटचा सामना 16 रोजी मलेशियाविरुद्ध होईल.
स्पर्धेत आठ संघांचा सहभाग
दरम्यान, दुबई येथे होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होत आहेत. या संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. अ गटात भारत, यूएई, पाकिस्तान आणि मलेशियाचा समावेश आहे, तर ब गटात अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ टॉप फोरमध्ये जातील आणि नंतर सेमीफायनलमध्ये जिंकणारे संघ अंतिम सामन्यात भिडतील. आशिया चषकातील सर्व सामने सोनी स्पोर्ट्सवर पाहता येणार आहेत.
युवा भारतीय संघ : आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), युवराज गोहिल, कनिष्क चौहान, खिलन पटेल, नमन पुष्पक, डी दीपेश, हेनिल पटेल, किशन कुमार सिंह, उद्धव मोहन, आरोन.