दक्षिण आफ्रिकेचा जोरदार पलटवार
दुसऱ्या टी 20 टीम इंडियाचा फ्लॉप शो : 51 धावांनी विजय : मालिकेत 1-1 बरोबरी : डिकॉक सामनावीर
वृत्तसंस्था/चंदीगड
मुल्लनपूर येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव करून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पहिल्या सामन्यात दमदार विजय मिळवलेल्या टीम इंडियाला या सामन्यात मात्र पराभवाचा सामना करावा लागला. डी कॉकच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आफ्रिकेने भारतासमोर 214 धावांचे आव्हान ठेवले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 162 धावांत ऑलआऊट झाला. आफ्रिकेने दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 51 धावांनी पराभव केला. आता, उभय संघातील तिसरा सामना दि. 14 रोजी धरमशाला येथे होईल.
आफ्रिकेने विजयसाठी दिलेल्या 214 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात प्खराब झाली. शुभमन गिल खातेही उघडू शकले नाहीत तर अभिषेक शर्मा (17) धावा करुन माघारी परतला. यानंतर जॅन्सेनने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (5) ला बाद करत टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. यानंतर अक्षर पटेल आणि तिलक वर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी 35 धावांची महत्त्वाची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अक्षरने संयमी खेळ करत 21 धावा केल्या, पण ओटनील बार्टमॅनने त्याचीही विकेट घेतली. तिलक वर्मा मात्र एकाकी लढत देत राहिला. त्याने फक्त 27 चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. पण दुस्रया टोकाकडून त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. त्याने सर्वाधिक 34 चेंडूत 62 धावांचे योगदान दिले. हार्दिक पांड्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असतानाही तो 23 चेंडूंमध्ये केवळ 20 धावा करत आऊट झाला. इतर तळाच्या फलंदाजांनीही निराशा केल्यामुळे भारतीय संघाचा डाव 162 धावांत आटोपला. आफ्रिकेकडून बार्टमनने 4 बळी घेत विजयात मोलाचे योगदान दिले.
आफ्रिकेचा दणदणीत विजय
प्रारंभी, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात क्विंटन डी कॉक आणि रिजा हेंड्रिंक्स यांनी केली. डावखुरा स्टार फलंदाज क्विंटन डी कॉक चांगलाच आक्रमक दिसून आला. डी कॉक आणि हेंड्रिंक्स यांनी पहिल्या गड्यासाठी 38 धावांची भागीदारी केली. हेंड्रिंक्स 8 धावा करून माघारी गेला. त्याला वरुण चक्रवर्तीने माघारी पाठवले.
डी कॉकने मैदानात आलेल्या एडन मार्करामसोबत 83 धावांची भागीदारी रचली आणि संघाचे शतक फलकावर लावले. ही जोडी जमलेली असतानाच मार्करम 26 चेंडूत 29 धावा करून माघारी परतला. त्यानंतरही डी कॉक आक्रमक खेळत राहिला आणि त्याने अर्धशतक पूर्ण केले. मार्करम बाद झाल्यानंतर डेवाल्ड ब्रेविसने त्याला काही काळ साथ दिली. यावेळी शतकाच्या उंबरठ्यावर असताना डी कॉक रनआऊट झाला. त्याचे शतक अवघ्या 10 धावांनी हुकले. त्याने 46 चेंडूत 5 चौकार आणि 7 षटकारांच्या आतषबाजीसह 90 धावांची खेळी साकारली. डिकॉक पाठोपाठ ब्रेविसही 14 धावा करुन बाद झाला. यानंतर फरेराने 16 चेंडूत नाबाद 30 तर मिलरने 12 चेंडूत नाबाद 20 धावा करत संघाला 20 षटकांत 4 बाद 213 धावापर्यंत मजल मारुन दिली.
भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठे षटक,अर्शदीपने टाकले 13 चेंडूंचे षटक
द.आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्शदीप सिंगच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. भारतासाठी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज असलेल्या अर्शदीपने या सामन्यात तब्बल 13 चेंडूची एक ओव्हर टाकली आणि 18 धावा दिल्या. अर्शदीपच्या 11 व्या ओव्हरची सुरुवातच खराब झाली. पहिल्याच चेंडूवर डी कॉकने षटकार ठोकला. त्यानंतर तर अर्शदीपची पूर्णपणे लाइन-लेंग्थच बिघडली आणि एका ओव्हरमध्ये तब्बल 7 वाईड टाकल्या. दरम्यान, या 13 चेंडूंच्या ओव्हरमुळे अर्शदीपच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. त्याने आयसीसी फुल मेंबर देशाच्या खेळाडूकडून टाकल्या गेलेल्या सर्वात मोठ्या ओव्हरच्या जागतिक विक्रमाचीही बरोबरी केली. अर्शदीपपूर्वी भारतासाठी सर्वात मोठी टी-20 ओव्हर टाकण्याचा विक्रम संयुक्तरित्या खलील अहमद आणि हार्दिक पंड्याच्या नावावर होता. दोघांनीही 11 चेंडूची ओव्हर केली होती.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका 20 षटकांत 4 बाद 213 (डिकॉक 46 चेंडूत 90, रीझा हेंड्रिक्स 8, मार्करम 29, डेवाल्ड ब्रेविस 14, फरेरा नाबाद 30, डेव्हिड मिलर नाबाद 20, वरुण चक्रवर्ती 2 बळी, अक्षर पटेल 1 बळी). भारत 19.1 षटकांत सर्वबाद 162 (अभिषेक शर्मा 17, शुभमन गिल 0, अक्षर पटेल 21, सूर्यकुमार यादव 5, तिलक वर्मा 34 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारासह 62, हार्दिक पंड्या 20, जितेश शर्मा 27, बार्टमन 24 धावांत 4 बळी, एन्गिडी, जॅन्सेन आणि सिम्पाला प्रत्येकी 2 बळी).