3 किलो गांजासह युवक ताब्यात; सांगली पोलिसांची कारवाई
सांगली प्रतिनिधी
सांगली शहर पोलिसांनी आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करत सक्त पेट्रोलिंग सुरू केले आहे. याच पेट्रोलिंगच्या दरम्यान आयुक्त बंगल्याशेजारी असणाऱ्या एका निर्जनस्थळी एक युवक संशयास्पद आढळून आला. त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्याकडे तीन किलो 100 ग्रॅम गांजा आढळून आला. हा गांजा जप्त करून त्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांचे नाव विश्वनाथ उर्फ बापू दिलीप काळे वय 33 रा. वाल्मिकी आवास, जुना बुधगाव रोड सांगली असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली शहर पोलिसांनी आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पेट्रोलिंग वाढविले आहे. त्यानुसार आयुक्त बंगल्याशेजारी पेट्रोलिंग करत असतानाच एका युवकाच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले त्यावेळी त्याच्याकडे एका कापडी पिशवीमध्ये निळ्या रंगाच्या बॉक्समध्ये हिरवट रंगाचा गांजा आढळून आला. त्या गांजाचे वजन केले असता तो तीन किलो 101 ग्रॅम आढळून आला आहे. त्याची बाजारभावाने किंमत 60 हजार 200 रूपये आहे. त्याबरोबरच एक 500 रूपये किंमतीचा इलेक्ट्रीक वजनकाटा, पाच हजार रूपये किंमतीचा मोबाईल असा एकूण 65 हजार 720 रूपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सांगली शहर पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय मोरे, उपनिरिक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, विनायक शिंदे, मच्छिंद्र बर्डे, सचिन शिंदे, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार गणेश कांबळे, सुमीत सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी, योगेश सटाले यांनी केली.