Kolhapur Crime : पेटवडगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 86 लाखांच्या चोरीप्रकरणी आरोपी जेरबंद
किनी टोलनाक्यावर पोलिसांचा सापळा; चोरीचा मुद्देमालसह आरोपी अटक
पेटवडगाव : कर्नाटकातील गदग शहरात शांतिदुर्ग ज्वेलर्स मध्ये आज पहाटेच्या दरम्यान चोरी करून सुमारे 86 लाख रुपयाचा मुद्देमाल कर्नाटकच्या बसमधून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अहमदाबाद इथल्या महंमद हुसेन या चोरट्यास पेटवडगाव पोलिसांनी किनी टोल नाक्यावर पकडून त्याला कर्नाटक पोलिसाच्या स्वाधीन केले.
- अहमदाबाद इथल्या नागपूरवाला चाळीत राहणाऱ्या महम्मद हुसेन याने आज बुधवार दिनांक 3 रोजी पहाटे तीन ते चार या वेळेत कर्नाटकातील गदग शहरातील शांतीदुर्ग ज्वेलर्स मध्ये दरोडा टाकला. यामध्ये चांदीचे दागिने, मौल्यवान खडे, रोख रक्कम असा सुमारे 86 लाख रुपये किमतीचे मुद्देमाल घेऊन तो कर्नाटक बसणे मुंबईच्या दिशेने पळुन निघाला होता. याबाबतची खबर पेटवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांना मिळताच त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सह किनी टोल नाक्यावर सापळा रचला होता.
आज सायंकाळी पाचच्या दरम्यान एक कर्नाटक बस किनी टोलनाक्यावर आली असता पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बसमधील प्रवाशांची झडती घेतली असता त्यामध्ये महम्मद हुसेन हा संशयित आरोपी सापडून आला. त्याच्याकडे दोन बॅग होत्या. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली.
त्याला ताब्यात घेऊन पेटवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याबाबतची माहिती कर्नाटक पोलिसांना दिल्यानंतर. गदग शहराचे डी वाय एस पी मुर्तुजा कादरी, पोलीस निरीक्षक धीरज शिंदे आणि त्यांचे पथक तात्काळ पेटवडगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले. चोरी केलेला मुद्देमाल आणि चोरट्यास कर्नाटक पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, पीएसआय माधव दिघोळे, आबा गुंडणके, महेश गायकवाड राजू साळुंखे, अनिल अष्टेकर, शरद मेनकर यांनी सहभाग घेतला.