For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एटीएममधून पैसे चोरणाऱ्या तरुणाला अटक

11:51 AM Dec 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
एटीएममधून पैसे चोरणाऱ्या तरुणाला अटक
Advertisement

कॉम्बिनेशन पासवर्डचा वापर करून मारला डल्ला : 7 लाख रुपयांचा ऐवज जप्त

Advertisement

बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अंजुमन बिल्डींगमध्ये असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून 8 लाख 65 हजार 500 रुपये पळविणाऱ्या तरुणाला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून 5 लाख 74 हजार रुपये रोकड व 1 लाख 56 रुपये किमतीचे एक मंगळसूत्र असा एकूण 7 लाख 30 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कृष्णा सुरेश देसाई (वय 23) रा. ज्योतीनगर, कंग्राळी खुर्द असे त्याचे नाव असून एटीएममध्ये पैसे जमा करण्यासाठी बँकेचे कंत्राट घेतलेल्या एसआयएस या कंपनीचा तो कामगार आहे. एटीएमचे कॉम्बिनेशन पासवर्ड वापरून त्याने मोठी रक्कम चोरल्याचे आयुक्तांनी सांगितले.

दि. 30 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, उपनिरीक्षक महांतेश मठपती, विठ्ठल हावण्णावर, एच. एल. केरुर, हवालदार लक्ष्मण कडोलकर, शंकर कुगटोळी, आय. एस. पाटील, नवीनकुमार, शिवाप्पा तेली, रमेश अक्की आदींनी ही कारवाई केली आहे. एटीएममध्ये रक्कम जमा करण्यासाठी कंत्राट घेतलेल्या खासगी कंपनीचा कृष्णा हा कर्मचारी आहे. रक्कम जमा करण्यासाठी एक कॉम्बिनेशन पासवर्ड असतो. त्या पासवर्डचा वापर करून त्याने रक्कम चोरल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. एटीएममधील रक्कम चोरल्यानंतर याच पैशातून कृष्णाने आपल्या पत्नीला 20 ग्रॅमचे मंगळसूत्र घेऊन दिल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.

Advertisement

होनिहाळ खून प्रकरणातील आयफोनचा शोध सुरू

होनिहाळजवळ झालेल्या निंगनगौडा सनगौडर या वाहनचालकाच्या खूनप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. खुनानंतर त्याच्या हातातील आयफोन आरोपींनी पाण्यात टाकल्याची कबुली दिली आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. पाण्यामध्ये काम करणाऱ्या मेटल डिटेक्टरचा वापर करून शोध घेऊनही आयफोन सापडला नाही. अटक करण्यात आलेल्या शिवानंद करवीनकोप व आकाश मॅगोटी या आरोपींना पोलीस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.