‘माझं वेणुग्राम’ : पिढ्यान्पिढ्या एकोप्याचा श्वास जपणारी मिरापूर गल्ली
शहापूरचं सांस्कृतिक हृदय : समाजप्रबोधनाचे उपक्रम राबवून गल्लीत एक वेगळीच ऊर्जा
नातेसंबंध हा जीवनाचा मूलाधार आहे. घरातील आप्तस्वकियांपासून ते शेजारी-पाजारी राहणाऱ्या लोकांपर्यंत परस्पर जपलेली नातीच समाजात विश्वास, एकोपा आणि सहकाराची भावना दृढ करतात. गल्लीत वाढणारे हे नातेसंबंध पुढील पिढीच्या घडणीत मोलाची भूमिका बजावतात. मिरापूर गल्ली अशा एकोपा, सांस्कृतिक सलोखा आणि ऐतिहासिक वारशाने नटलेली शहापूरमधील एक जिवंत परंपरा आहे.
गल्लीचा इतिहास :धार्मिक विविधतेचे केंद्र
छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानापासून अवघ्या काही अंतरावर वसलेली मिरापूर गल्ली शहापूरच्या खडेबाजार रस्त्याला जोडते. ब्रिटिशकाळात सांगली संस्थानाने उभारलेली चिंतामणराव शाळा व सध्याचे कॉलेज, श्रीराम मंदिर, महादेव मंदिर,दत्तमंदिर आणि मीरासाहेबांची ऐतिहासिक दर्गा या सर्व धार्मिक स्थळांच्या उपस्थितीमुळे या परिसराला विशेष सांस्कृतिक संपन्नता लाभली असून सदर माहिती ‘तरुण भारत’च्या ‘माझं वेणुग्राम’ मालिकेद्वारे वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत.
संस्थानाच्या सुरक्षेत वाढलेला परिसर
छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानाजवळच्या बँक ऑफ इंडिया कॉर्नरपासून महात्मा फुले रोड, गोवावेस चौक, आनंदवाडी परिसर ते बॅरिस्टर नाथ पै चौक शहापूरपर्यंतचा परिसर सांगली संस्थानाच्या अखत्यारित तर, यापलीकडील भाग ब्रिटिशांच्या ताब्यात. शहापूर हे संस्थानाच्या हद्दीत असल्याने मिरापूर गल्लीतील नागरिक त्या काळातही सुरक्षितता आणि स्थैर्याचा अनुभव घेत.
मीरासाब दर्ग्यामुळे गल्लीचे नामकरण आणि नात्यांचे पूल
मिरापूर गल्लीचे नाव पडले ते तेथील मीरासाहेबांच्या दर्ग्यामुळे.विशेष म्हणजे या दर्ग्यात मुस्लीम बांधवांसोबत हिंदू नागरिकही मनोकामाना व्यक्त करण्यासाठी येतात. नित्यनेमाने येथे दररोज दिवाबत्ती केली जाते. या परिसरात दहा ते पंधरा मुस्लीम कुटुंबीय सर्वांसोबत गुण्यागोविंदाने नांदत आहेत. धार्मिक विविधता असूनही सलोखा आणि एकात्मता जपण्याचा हा सुंदर वारसा आजही टिकून आहे.
कौलारू घरांची ऊब आणि शेजारधर्माचा सुवर्णकाळ
कधी काळी मिरापूर गल्लीमध्ये मातीचे रस्ते आणि कौलारू घरे होती. 1960-65 दरम्यान महानगरपालिकेची नळजोडणी होईपर्यंत स्वच्छ, निर्मळ विहिरीचे पाणीच पिण्यासाठी वापरले जाई. घरगुती कार्यक्रमांमध्ये संपूर्ण गल्ली एकत्र येऊन सहभाग घेणे, ही त्या काळातील संस्कृतीची वैशिष्ट्यापूर्ण झलक.
देश-विदेशात कार्यरत पिढी आणि ‘घरट्याची ओढ’
आजची पिढी उच्चशिक्षण घेऊन देश-विदेशात प्रतिष्ठित पदांवर कार्यरत आहे. परंतु वेळोवेळी घरातील समारंभ, सण अथवा विशेष प्रसंगी मात्र हीच पिढी आपल्या मिरापूर गल्लीकडे आवर्जून परतताना दिसते. घराची ओढ आणि संस्कारांची गुंफण अजूनही दृढ असल्याचे हे खरे उदाहरण. याच मातीतील एक अभिमानास्पद नाव म्हणजे श्रीनिवास ठाणेदार-मिरापूर गल्लीचे सुपुत्र, ज्यांची अमेरिकेच्या काँग्रेस पक्षामधून खासदारपदी निवड झाली आहे. या यशाचा अभिमान संपूर्ण गल्लीत व्यक्त होतो.
मंदिरे, उत्सव अन् तरुणाईची समाजप्रबोधनाची परंपरा
उत्तर प्रदेशातून आलेल्या साधू महाराजांनी उभारलेले हनुमान मंदिर, त्याच ठिकाणी स्थापन केलेले श्ा़dरीराम मंदिर आणि नरसिंहाची मूर्ती ही धार्मिक संपन्नतेची उदाहरणे. शिवशंकराचे मंदिर गल्लीत धार्मिक विविधता समृद्ध करते. या मंदिरांतर्फे विविध सण, उत्सव, महाप्रसादाचे आयोजन केले जाते. गणेशोत्सव आणि शिवजयंतीत तरुण मंडळी समाजप्रबोधनाचे उपक्रम राबवून गल्लीत एक वेगळीच ऊर्जा निर्माण करतात.
नात्यांचा अजोड वारसा
सर्व धर्मांचा समभाव, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक ओळख जपत मिरापूर गल्लीची कहाणी आजही तितकीच तेजस्वी आहे. शहापूरच्या सांस्कृतिक नकाशावर मिरापूर गल्ली ही केवळ एक वस्ती नाही तर पिढ्यान्पिढ्या एकोप्याचा श्वास जपणारी जिवंत परंपरा आहे.
ब्रिटिशकालीन रचनेची चिंतामणराव शाळा
पटवर्धन सरकारांनी स्थापन केलेली चिंतामणराव शाळा ही ब्रिटिशकालीन वास्तुकलेचे दिमाखदार उदाहरण. पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थी इथे शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत.
‘माझं वेणुग्राम’मालिकेतून उलगडतील बेळगावच्या ऐतिहासिक गल्ल्यांच्या कहाण्या
‘तरुण भारत’ची विशेष मालिका ‘माझं वेणुग्राम’द्वारे बेळगावातील ऐतिहासिक,सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व असलेल्या गल्ल्यांच्या अज्ञात आणि रंजक कहाण्या उलगडल्या जात आहेत. या मालिकेतून अशा अनेक गल्ल्यांची ओळख अधोरेखित होत आहे, ज्या आजही परंपरा, एकोपा आणि सांस्कृतिक वारसा जपत, बेळगावची ओळख समृद्ध करत आहेत. ‘तरुण भारत’च्या युट्यूब चॅनलवर तसेच दैनिक आवृत्तीमध्ये. ‘माझं वेणुग्राम’ ही मालिका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी प्रसिद्ध होत आहे. वाचकांनी याची नोंद घ्यावी, ही विनंती.