वजन घटविण्याचा अट्टाहास अंगलट
चालणे-फिरणे झाले अवघड
सध्या लोकांची लाइफस्टाइल बदलली आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अधिक सुविधेमुळे लोकांचे वजन वाढते. अशा स्थितीत त्यांच्यासमोर वाढलेले वजन कशाप्रकारे कमी करावे हे त्यांच्यासमोर आव्हान असते. परंतु स्वत:ला चालता फिरता येणार नाही इतपत देखील कुणी वजन कमी करत नाही. पण एक युवती वजन घटविण्यावरून इतकी दुराग्रही आहे की तिने स्वत:चे वजन लहान मुलांइतके करून घेतले आहे. तंदुरुस्त राहण्याची इच्छा सर्वांना असते, परंतु कुणी चालता फिरता येणार नाही इतकाही स्लीम होऊ इच्छिणार नाही. चीनच्या एका युवतीने स्लिम होण्याच्या हट्टापोटी वजन घटवून 25 किलो केले आहे. तिला पाहून ती खाली कोसळेल किंवा तिची हाडं मोडतील अशी भीती वाटू लागते.
केवळ 25 किलो वजन
ही युवती सोशल मीडियावर ‘बेबी टिंग्झी’ नावाने अस्तित्वात आहे. तिची उंची 160 सेंटीमीटर म्हणजेच 5 फूट 2 इंच आहे. तर तिचे वजन केवळ 25 किलोग्रॅम आहे. चायनीज सोशल मीडिया डोउयीनवर तिची 42 हजार पॅन्स आहेत. हे चाहते तिची वेट लॉस जर्नी पाहतात. चीनच्या गुआंगडॉन्ग येथे राहणारी युवती इतकी स्लीम झाली आहे की तिच्या शरीराचा सांगाडाच दिसून येतो. ती लोकांना नाचून दाखविते आणि फॅन्सी आउटफिट्स परिधान करून दाखविते.
बेबी टिंग्झीचे हात-पाय अत्यंत अशक्त आहेत, तर शरीरावर मांस अजिबात नाही. तरीही ती स्वत:चे वजन आणखी कमी करू इच्छिते. तिची स्थिती पाहून तिने हा प्रकार थांबविला नाही तर एनोरेक्सिया म्हणजेच गंभीर कुपोषणाला बळी पडशील, असा सल्ला देण्यात आला आहे. अनेकांनी तिला डॉक्टरांची मदत घेण्याचा सल्ला दिला आहे.