भारतीय राजदूतांच्या माघारीचा इन्कार
अमेरिकेने फेटाळले या संबंधांमधील सर्व आरोप
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारत आणि कॅनडा यांच्यातील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने अमेरिकेतील भारतीय राजदूतावास अधिकाऱ्यांना अमेरिका सोडण्याचा आदेश दिला आहे, या वृत्ताचा अमेरिकेने इन्कार केला आहे. अमेरिकेतील खलिस्तानवादी गुरुपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येच्या कटासंदर्भात भारत उत्तरदायित्व निश्चित करेल, अशी आमची अपेक्षा असल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अमेरिका हा कॅनडाचा मित्र देश असल्याने कॅनडाला पाठिंबा देण्यासाठी अमेरिका भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना परतीचा आदेश देण्याच्या विचारात आहे, असे वृत्त काही माध्यमांनी पसरविले होते. तथापि, अमेरिकेचा तसा कोणताही विचार नाही. तसेच अशी योजनाही नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले. कॅनडातील भारतीय उच्चायोग प्रमुख संजय वर्मा आणि आणखी पाच उच्चायोग अधिकाऱ्यांना कॅनडाने कॅनडा सोडण्याचा आदेश काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे अमेरिकेनेही भारताविरोधात पाऊल उचलले आहे, असे वृत्त सध्या पसरले आहे. अमेरिकेच्या विदेश विभागाचे मुख्य प्रवक्ता मॅथ्यू मिलर यांनी यासंबंधी अमेरिकेची प्रतिक्रिया व्यक्त करताना आरोपांचा इन्कार केला आहे.
विकाश यादवसंबंधी वक्तव्य
भारताची गुप्तहेर संस्था ‘रॉ’ चा माजी कर्मचारी विकाश यादव याचे अमेरिकेला प्रत्यार्पण करावे, अशी मागणी अमेरिकेने भारताकडे केली आहे काय, असा प्रश्न मिलर यांना विचारण्यात आला होता. मात्र, प्रत्यार्पणाचा प्रश्न अमेरिकेच्या कायदा विभागाचा आहे. त्यामुळे या संदर्भातील प्रश्न आपण कायदा विभागालाच विचारावेत. विदेश व्यवहार विभागाचा प्रवक्ता यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असे उत्तर मिलर यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
गुप्तचर संस्थेकडून उल्लेख
अमेरिकेतील शीख फुटीरतावादी गुरुपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणात अमेरिकेच्या एफबीआय या गुप्तचर संस्थेने भारताचा नागरीक विकाश यादव याचा उल्लेख केला असून या प्रकरणात तो हवा असल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे. विकाश यादव सध्या आणखी एका प्रकरणात भारतात अटकेत आहे. त्याचा भारताची गुप्तहेर संस्था रॉशी आता कोणताही संबंध राहिलेला नाही, असे भारताच्या गृहविभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.