गोडसेवाडीतील तरुणीची बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या
टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर
बेळगाव : गोडसेवाडी-टिळकवाडी येथील एका तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. बेरोजगारीमुळे या तरुणीने आपले जीवन संपविल्याचे सांगण्यात आले. अक्षता लक्ष्मण नांदवडेकर (वय 21), रा. गोडसेवाडी-टिळकवाडी असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. शनिवार दि. 15 नोव्हेंबरच्या सकाळी 10 ते सायंकाळी 4.30 या वेळेत ही घटना घडली आहे. रात्री आईने दिलेल्या फिर्यादीवरून टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अक्षता एका खासगी कार्यालयात काम करीत होती. पगार कमी असल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी तिने हे काम सोडले होते. नव्या कामाच्या ती शोधात होती. मात्र, तिला कोठेही रोजगार मिळाला नाही. म्हणून या तरुणीने मनस्तापातून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. टिळकवाडीचे पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.