अज्ञात वाहनाने घेतला तरुणाचा बळी
सावगावच्या तरुणाला ठोकरले : केएलई बायपासजवळ अपघात
बेळगाव : अज्ञात वाहनाने मोटारसायकलला ठोकरल्याने सावगाव येथील तरुण जागीच ठार झाला. गुरुवारी सकाळी 5.50 वाजण्याच्या सुमारास पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील केएलई बायपासजवळ हा अपघात घडला. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. शुभम लक्ष्मण घुग्रेटकर (वय 29) रा. कलमेश्वर गल्ली, सावगाव असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तो आपल्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. मोटारसायकलवरून काकती येथे कामावर जाताना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने तो जागीच ठार झाला आहे. घटनेची माहिती समजताच वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत तोटगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम हा काकतीजवळील एका टायर कंपनीत कामाला जात होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी मोटारसायकलवरून कामावर जाताना केएलई बायपासजवळ अज्ञात वाहनाने ठोकरल्याने त्याचा मृत्यू झाला. रोज तो बॉक्साईट रोडवरून जात होता. गुरुवारी त्याने बॉक्साईट रोडऐवजी महामार्गावरून जाण्याचा निर्णय घेतला. बायपासपासून थोड्या अंतरावर ही घटना घडली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.