खेडगे धबधब्यात तरुण बुडाला ! मित्रांसोबत गेला होता धबधबे पहाण्यासाठी
कडगाव वार्ताहर
भुदरगड तालुक्यातील खेडगे येथील मंडपी कडा म्हणून परिचित असलेल्या धबधब्यात सूरज बळवंत मेणे (वय 25) हा तरुण पाय घसरून पडल्याने खोल पाण्यात बुडाला. ही घटना मंगळवारी घडली. रात्री उशिरापर्यंत मेणे याचा शोध सुरू होता. मात्र अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. बुधवारी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात येणार आहे.
वेंगरूळ (ता. भुदरगड) येथील सूरज आपल्या तीन मित्रांसोबत खेडगे येथील धबधबे पाहण्यासाठी गेला होता. दुपारी दोन वाजल्यानंतर मंडपी कडा धबधबा पाहण्यासाठी ते गेले. तेथील धबधब्यालगत शेवाळलेल्या दगडावरून पाय घसरल्याने सूरज मेणे खोल पाण्यात बुडाला. मेणे याचा योगेश कोळी, शशिकांत पाटील यांच्यासह खेडगे, नितवडे, वेंगरूळ येथील युवकांनी शोध घेतला मात्र पाऊस, उंचावरून कोसळणारा पाण्याचा जोराचा प्रवाह व पाण्याची खोली यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. यामुळे जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापनास पाचारण करण्यात आले. अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. बुधवारी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात येणार आहे. घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी भुदरगडचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे, पोलीस उपनिरीक्षक योगेश गोरे, विनोद दबडे, रोहित टिपुगडे यांच्यासह वनविभागची टीम घटनास्थळी दाखल झाली होती.