रेल्वेतून पडून जखमी झालेल्या महिलेची बॅग लांबवणाऱ्या तरुणाला अटक
बेळगाव : रेल्वेतून उतरताना पाय घसरून पडून जखमी झालेल्या एका महिलेची बॅग पळविणाऱ्या तरुणाला बेळगाव रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून 35 ग्रॅमचे मंगळसूत्र पोलिसांनी जप्त केले आहे. आईबरोबर नऊ वर्षांची मुलगीही पडून जखमी झाली आहे. 26 ऑक्टोबर रोजी राणी चन्नम्मा एक्स्प्रेसमधून खाली उतरताना चिकोडी रोड रेल्वेस्थानकावर गंगा (वय 29), तिची मुलगी अश्विनी (वय 9) या दोघी पडून जखमी झाल्या होत्या. या मायलेक बेंगळूरहून आल्या होत्या. या दोघी कब्बूरला जाणार होत्या. त्यांना नेण्यासाठी कुटुंबीयही रेल्वेस्थानकावर पोहोचले होते.
कुटुंबीय व सहप्रवासी रेल्वेतून पडून पायाला गंभीर दुखापत झालेल्या आई व तिच्या मुलीला इस्पितळात हलवण्यासाठी धडपडत होते. या घाईत गंगा यांची बॅग रेल्वेतच राहिली. या बॅगमध्ये सहा हजार रुपये रोख रक्कम व 35 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र होते. त्याची किंमत सुमारे 4 लाख 2 हजार 500 रुपये इतकी होते. जखमी मायलेकीवर गोकाक येथील इस्पितळात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी त्यांची जबानी घेण्यासाठी पोहोचले त्यावेळी रेल्वेत बॅग चोरीला गेल्याची माहिती या मायलेकीने दिली.
रेल्वेचे पोलीस अधीक्षक यतीश एन., उपअधीक्षक सोमशेखर जुट्टल, पोलीस निरीक्षक सुरेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सत्याप्पा मुक्कन्नावर, मलिकसाब मुल्ला, रायाप्पा गुंडगी, मानाप्पा बडीगेर, गुरुपाद कोरी, सुनील खेब्बानी व घटप्रभा आरपीएफचे अमित महादेव पुजारी आदींनी आरोपीचा शोध घेतला. अजित सुनील गाडीवड्डर (वय 23) रा. चिंचली असे त्याचे नाव आहे. गेल्या रविवार दि. 26 ऑक्टोबर रोजी अजितने राणी चन्नम्मा एक्स्प्रेसमधून चोरलेली बॅग, मंगळसूत्र पोलिसांनी जप्त केले आहे. सहा हजार रुपये मात्र त्याने खर्च केल्याचे तपासात उघडकीस आले.