युवा भारतीय संघ मालिका जिंकण्यास सज्ज
वृत्तसंस्था/ हरारे
युवा भारतीय तारे आज शनिवारी येथे चौथ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा सामना करताना पुन्हा एकदा सर्वोत्तम कामगिरी करून मालिका विजयासह सर्वांत लहान प्रकारात नवीन युगाचा प्रारंभ करण्यास उत्सुक असतील. पहिल्या सामन्यातील अनपेक्षित पराभवानंतर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यामध्ये सूर मिळवून सर्वसमावेशक विजयांसह 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
सध्याच्या क्रिकेटच्या विश्वाचा विचार करता झिम्बाब्वेविरुद्धची मालिका जिंकणे ही काही उत्कृष्ट कामगिरी मानता येणार नाही. परंतु काही युवा खेळाडूंमध्ये त्यामुळे नक्कीच महत्वाकांक्षा निर्माण होईल. ते आधुनिक काळातील काही महान खेळाडूंच्या निवृत्तीनंतर संघाला पुढे नेण्यास उत्सुक आहेत. वॉशिंग्टन सुंदर आणि अभिषेक शर्मा यांची उदाहरणे याबाबतीत देता येतील. ‘टी-20’मधून रवींद्र जडेजाच्या निवृत्तीनंतर वॉशिंग्टनची नजर फिरकी मारा करू शकणाऱ्या अष्टपैलू खेळाडूच्या स्थानावर आहे आणि तामिळनाडूच्या या खेळाडूने झिम्बाब्वेविऊद्ध 4.5 च्या इकोनॉमी रेटने सहा बळी घेत काही आशादायक चिन्हे दाखविली आहेत.
श्रीलंकेच्या आगामी दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी निवड समितीची जेव्हा बैठक होईल तेव्हा त्यांना वॉशिंग्टनच्या नावाचा गांभीर्याने विचार करावा लागेल. या 24 वर्षीय खेळाडूने या भारतीय संघाला पॉवर प्लेमध्ये आणि बाहेर वापरण्यासाठी गोलंदाजाचा पर्याय दिला आहे. शिवाय तो खालच्या फळीत फलंदाज म्हणून उपयोगी ठरू शकतो. त्याच्याकडे गरज पडल्यास क्रमवारीत वर येऊन फलंदाजी करण्याचे तंत्र आहे.
अभिषेकने येथे दुसऱ्या टी-20 मध्ये 47 चेंडूंत शतक झळकावून त्याच्याविषयीच्या अपेक्षा वाढविल्या आहेत. भारताकडे यापुढे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची या प्रकारात सेवा असणार नाही आणि यशस्वी जैस्वाल सलामीचे एक स्थान मिळविण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. अभिषेकला दुसऱ्या सलामीवीराच्या जागेवरील आपला दावा आणखी मजबूत करण्याची संधी आहे. त्यासाठी शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड हे इतर प्रबळ दावेदार आहेत.
याचा अर्थ संजू सॅमसन व शिवम दुबे यासारख्यांना या मालिकेतून काहीच हाती लागणार नाही असे नव्हे. विश्वचषकात त्यांना फारच मर्यादित वा अत्यल्प संधी मिळाली. या मालिकेतील उरलेले दोन सामने दुबे आणि सॅमसनसाठी संघातील स्थान मजबूत करण्याच्या दृष्टीने संधी असेल. भारतीय व्यवस्थापन त्यांच्या गोलंदाजांच्या, विशेषत: लेगस्पिनर रवी बिश्नोईच्या कामगिरीवर खूश असेल. बिश्नोइने वॉशिंग्टनसारखेच सहा बळी घेतले आहेत आणि वेगवान गोलंदाज आवेश खाननेही चमक दाखविली आहे. मागील सामन्यात विश्रांती मिळाल्यानंतर मुकेश कुमार डावखुरा वेगवान गोलंदाज आवेश खानच्या जागी येऊ शकतो.
दुसरीकडे, पहिल्या सामन्यात भारताला पराभूत केल्यानंतर झिम्बाब्वेची घसरण झाली आहे. वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझाराबानीने टाकलेले प्रभावी स्पेल आणि डीओन मायर्सने झळकावलेले अर्धशतक हीच तेवढी त्यांची चमकदार बाजू राहिली आहे.
संघ : भारत-शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, शिवम दुबे, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.
झिम्बाब्वे : सिकंदर रझा (कर्णधार), अक्रम फराज, बेनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, चतारा तेंडाई, जोंगवे ल्यूक, काइया इनोसंट, मदांडे क्लाइव्ह, मधेवेरे वेस्ली, माऊमणी तादिवानाशे, मसाकादझा वेलिंग्टन, मावुता ब्रँडन, मुझाराबानी ब्लेसिंग, मायर्स डिओन, नक्वी अंतुम, नगारवा रिचर्ड, शुंबा मिल्टन.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 4.30 वा.