आशिया चषकासाठी युवा भारतीय संघाची घोषणा
मुंबईच्या आयुष म्हात्रेकडे नेतृत्वाची धुरा : वैभव सूर्यवंशीचाही समावेश
वृत्तसंस्था/ मुंबई
आगामी युवा आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या 15 सदस्यीय संघाचे कर्णधारपद मुंबईकर आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आले आहे. तर विहान मल्होत्राची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेला येत्या 12 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन दुबईत केले जाणार आहे.
14 वर्षीय स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीला देखील भारतीय संघात स्थान मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी वैभव भारतीय अ संघाचं प्रतिनिधित्व करताना, आशिया चषक रायझिंग स्टार्स ही स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या स्पर्धेत फलंदाजी करताना त्याने यूएईविरूद्धच्या सामन्यात वादळी शतकी खेळी केली होती. सध्या तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत बिहार संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. दरम्यान, संघाचे नेतृत्व मुंबईकर आयुष म्हात्रे करताना दिसेल. त्याने याआधी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यशस्वी कामगिरी केली आहे. यामुळे आगामी आशिया स्पर्धेत त्याच्याकडून निश्चितच दर्जेदार कामगिरीची अपेक्षा असेल.
याशिवाय, युवा खेळाडू किशन सिंगलाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे. पण, अद्याप तो फिट झालेला नाही. त्यामुळे स्पर्धेत तो खेळणार की नाही याबाबत उत्सुकता असणार आहे.
आशिया चषक स्पर्धेसाठी युवा भारतीय संघ : आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वेदांत त्रिवेदी, अभिग्यान कुंडू (यष्टीरक्षक), हर्वेश सिंग (यष्टीरक्षक), युवराज गोहिल, कनिष्क चौहान, खिलन पटेल, नमन पुष्पक, डी दिपेश, हेनिल पटेल, उद्धव मोहन, आरोन जॉर्ज, किशन कुमार सिंग (फिट असेल तर).
राखीव : राहुल कुमार, हेमचुदेषन जे, बीके किशोर, आदित्य रावत.
स्पर्धेत आठ संघाचा सहभाग
या स्पर्धेत् एकूण आठ टीम सहभागी होतील. यात भारत, पाकिस्तान ग्रुप ए मध्ये आहे. त्याशिवाय या ग्रुपमध्ये दोन क्वालिफायर टीम असतील. ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि एक क्वालिफायर टीम आहे. दरम्यान, उपांत्य फेरी 19 डिसेंबरला तर अंतिम फेरी 21 रोजी डिसेंबरला होणार आहे.