तरुण भारत-बेळगाव, गोवा, पुणे, कोल्हापूर, म्हापसा यांची विजयी सलामी
लोकमान्य चषक प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य को-ऑप. सोसायटी आयोजित लोकमान्य प्रिमीयर लीग आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनादिवशी तरुण भारत-बेळगाव, तरुण भारत-गोवा, कोल्हापूर व म्हापसा संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजयी सलामी दिली. दत्ता धुरी, विष्णू चिरमुरी, संजय दळवी, मयुर वीर, योगेश धुडूम यांना ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला.
एसकेई प्लॅटिनम ज्युबिली मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी एसकेई प्लॅटिनम ज्युबिली क्रीडा विभागाचे चेअरमन आनंद सराफ, सोसायटीचे व्हा. चेअरमन अजित गरगट्टी, सभासद पंढरी परब, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, गजानन धामणेकर, सीईओ अभिजित दिक्षित, रिजनल मॅनेजर कुलकर्णी, दीपकगुरंग, स्पर्धा सचिव राजू नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
आनंद सराफ यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. इतर मान्यवरांच्या हस्ते शांतीचे प्रतीक म्हणून रंगीबेरंगी फुगे सोडून स्पर्धेला चालना देण्यात आली. या स्पर्धेत 12 संघांनी भाग घेतला असून बेळगाव, कोल्हापूर, पुणे, मुंबई, गोवा, सावंतवाडी, रत्नागिरी येथील संघांनी सहभाग घेतला आहे.
उद्घाटनाच्या सामन्यात बेळगाव तरुण भारत संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 65 धावा केल्या. त्यात दत्ता धुरीने 2 षटकारासह 25, अरुण लट्टेने 2 षटकारासह 15, हर्षल प्रभूने 13 धावा केल्या. सावंतवाडीतर्फे पंकज परबने 2, वैभव परब व गौरव हेर्लेकरने प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सावंतवाडी संघाने 8 षटकात 8 गडी बाद 48 धावाच केल्या. त्यांच्या श्रीधर परबने 1 षटकार 1 चौकारासह 18 तर नित्यानंद मांजरेकरने 10 धावा केल्या. बेळगाव तरुण भारततर्फे सुहास रावलने 15 धावांत 3, दत्ता धुरी व तन्वीरने प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात तरुण भारत गोवा संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 1 गडी बाद 86 धावा केल्या. त्यात राजाराम भट्टने 2 षटकार 2 चौकारांसह नाबाद 41, विष्णू चिरमुरीने 3 षटकार, 1 चौकारांसह नाबाद 35 धावा केल्या. मडगावतर्फे कुशल देसाईने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मडगाव संघाने 8 षटकात 6 बाद 33 धावा केल्या. त्यात स्वप्नील नाईक व गौरव नाईक यांनी प्रत्येकी 8 धावा केल्या. गोवातर्फे विष्णू चिरमुरीने 11 धावांत 3 तर महेश मयेकर, परशराम सावंत व तेजस गावडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तिसऱ्या सामन्यात कोल्हापूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 128 धावा केल्या. त्यात कर्णधार संजय दळवीने 5 षटकार, 4 चौकारांसह 19 चेंडूत 56 धावा करुन अर्धशतक झळकविले. संग्राम चाबुकने 3 षटकार, 2 चौकारांसह 39 तर अवनिश मोरेने नाबाद 10 धावा केल्या. मॅनेजमेंटतर्फे अमित पाटीलने 25 धावांत 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मॅनेजमेंट संघाने 8 षटकात 5 गडी बाद 52 धावा केल्या. त्यात बलराम जाधवने नाबाद 14 तर अमित पाटीलने 10 धावा केल्या. कोल्हापूरतर्फे दिलीप पाटीलने 11 धावांत 2 तर स्वप्नील पाटील, अवनिश मोरे, यश हंजी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
चौथ्या सामन्यात म्हापसा संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 73 धावा जमविल्या. त्यात गोविंद पालेकर व मयुर वीर यांनी प्रत्येकी 24, देवानंद शेटेने 12 धावा केल्या. कार्पोरेटतर्फे जोतिबा दुनदुनीने 17 धावांत 2, सागर पाटीलने 18 धावांत 2 तर अरविंदने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना कार्पोरेट संघाने 8 षटकात 7 गडी बाद 54 धावा केल्याने म्हापसाने 19 धावांनी विजय मिळविला. त्यात विशाल सावंतने नाबाद 13 तर राहुल बॉबीने 12 धावा केल्या. म्हापसातर्फे मयुर वीरने 8 धावांत 5 तर जयंत लाडने 1 गडी बाद केला.
पाचव्या सामन्यात मडगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 35 धावा केल्या. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. पुणेतर्फे आदित्य परांपजे, आदित्य, अंजर, सौनक कुलकर्णी, गणेश गुंड्या यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना पुणे संघाने 4.1 षटकात 1 गडी बाद 36 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात योगेश धुडूमने 1 षटकारासह 21 नाबाद धावा केल्या. गौरव नाईकने 1 गडी बाद केला.