Satara News: इन्स्टाग्रामवरील प्रेमाचा शेवट ‘पोक्सो’च्या गुन्ह्यात
अल्पवयीन मुलीस पळवणारा संशयित कर्नाटकातून ताब्यात
कराड: परिसरातील अल्पवयीन मुलगी व कर्नाटकातील तरुण यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. चॅटिंगच्या माध्यमातून ती ओळख हळूहळू प्रेमात परिवर्तित झाली. एकमेकाला प्रत्यक्ष न भेटताच दोघेही भावनिकदृष्ट्या गुंतले. अखेर तो तरुण कराड परिसरात आला व मुलीला फूस लावून घेऊन गेला. या घटनेने कुटुंबाची झोप उडाली.
कराड पोलिसांनी या घटनेचा अत्यंत गोपनीय आणि गांभीर्याने तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक दीपक वागवे यांच्या पथकाने कोणताही धागादोरा नसताना कर्नाटकात जाऊन संशयितासह अल्पवयीन मुलीस ताब्यात घेत कराडला आणले. मुलावर अखेर बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला.
कराड परिसरातील ती अल्पवयीन मुलगी आणि कर्नाटकातील तरूणाची इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. एकमेकाला प्रत्यक्ष न भेटताच इन्स्टावरील चॅटिंगचे प्रेमात रूपांतर झाले. अखेर तो कराड परिसरात आला. ती सुद्धा कुटुंबाचा विचार न करता त्याच्यासमवेत गेली. तिचा शोध घेऊन कुटुंब अस्वस्थ झाले.
कुटुंबीयांनी कराड पोलिसात अपहरणाची फिर्याद दाखल केली. पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक वागवे यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला.
मोबाईल फॉरमॅट... कोणताच धागादोरा नाही
अल्पवयीन मुलीने तिचा मोबाईल घरातच ठेवला होता, मात्र तो पूर्णत: फॉरमॅट केल्याने नेमके ती कोणासमवेत गेली, याचा एकही धागादोरा पोलिसांकडे नव्हता. उपनिरीक्षक दीपक वागवे यांनी मुलीच्या पालकांसह तिच्या मैत्रिणींकडे विचारपूस करत तांत्रिक मुद्यांच्या आधारे सलग 21 दिवस तपास केला.
अखेर कोणताही धागादोरा नसताना दीपक वागवे यांनी तांत्रिक अन् सोशल मीडियाचा वापर करत ते दोघे कर्नाटकात असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी तात्काळ उपनिरीक्षक वागवे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे संग्राम पाटील, सोनाली पिसाळ या पोलिसांचे पथक कर्नाटकला रवाना केले.
21 दिवसांच्या तपासाला अखेर यश
शनिवारी कर्नाटकात पोहोचलेल्या कराड पोलिसांनी गोपनीयता बाळगत साध्या वेशात कर्नाटकात दोघे रहात असलेल्या ठिकाणी छापा टाकला. दोघांनाही ताब्यात घेण्यात पोलिसांना अखेर यश आले. पोलिसांनी त्यांना कराडला घेऊन येत संशयितावर अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेण्यासह तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत अत्याचार केल्याच्या कलमान्वये पोक्सोचा गुन्हा दाखल केला. तर अल्पवयीन मुलीचे समुपदेशन करत पालकांच्या ताब्यात दिले.
इन्स्टाग्रामवरील प्रेमाचा शेवट पोक्सोच्या गुन्ह्यात झाला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी राजू ताशिलदार व उपनिरीक्षक दीपक वागवे यांच्या पथकाचे अभिनंदन केले.
कर्नाटकात शोध घेणे जिकिरीचे
अल्पवयीन मुले व मुली यांना मोबाईल वापरण्यास देताना पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. इन्स्टाग्रामसह सोशल मीडियावर आपली वैयक्तिक माहिती मुलींनी शेअर करणे टाळावे अन्यथा त्याचा अनेक संशयित फायदा घेतात हे या घटनेतून सिद्ध होते.
सोशल मीडिया जसे वरदान आहे तसेच ते धोकादायकही आहे, असे पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, उपनिरीक्षक दीपक वागवे यांच्या पथकाने केलेला तपास हा अत्यंत गुंतागुंतीचा अन् जिकिरीचा होता. या तपासाने पोलिसांचे मनोबल उंचावले आहे.