छत्रपती शिवरायांच्या विचारांची युवा पिढीला गरज
बाळेकुंद्री खुर्द येथे शिवजयंती उत्साहात साजरी
वार्ताहर/बाळेकुंद्री
समाजाच्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या विश्वासास पात्र राहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्याची स्थापना करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या शिवाजी महाराजांच्या विचारांची आजच्या युवापिढीला माहिती देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बाळेकुंद्री खुर्द ग्रा. पं. सदस्य युवराज अनंतराव जाधव यांनी केले. ते मंगळवारी गावातील बसस्थानकानजीक शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर प्रमुख अतिथी या नात्याने बोलत होते. यावेळी गावातील युवक मंडळे, विविध समाजांच्या मान्यवरांनी शिवप्रतिमेला विधिवत पूजनाव्दारे पुष्पहार घालून वंदन केले. यावेळी युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय.. भारत माता की जय... जय भवानी जय शिवाजी... अशा जयजयकाराने शिवाजी चौकाचा परिसर दणाणून सोडला. यावेळी शांत चंदगडकर, श्याम कन्नेकर, राजू पाटील, गजानन पाटील, देमाना नायक, सुजीत पाटीलसह गावातील शिवप्रतिष्ठानचे कायकर्ते व महिलावर्ग उपस्थित होता.