बेळगावला एअरोस्पेस-डिफेन्स पार्क सुरू करा!
आमदार अरविंद बेल्लद यांची मागणी : उद्योगमंत्र्यांकडून सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन : बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार
बेळगाव : बेळगावात एअरोस्पेस पार्क व डिफेन्स पार्क सुरू करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते अरविंद बेल्लद यांनी शुक्रवारी केली. उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी मोठे उद्योगधंदे या परिसरात स्थापन करण्याची गरज आहे. बेळगाव आणि हुबळी-धारवाडच्या मध्ये एअरोस्पेस पार्क सुरू केल्यास बेरोजगारी कमी करण्यासाठी मदत होणार आहे, असे बेल्लद यांनी सांगितले. विधानसभेत प्रश्नोत्तर तासात देवनहळ्ळी तालुक्यातील एअरोस्पेस पार्कविषयी अवजड आणि मध्यम उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी लक्ष वेधले. बेंगळूर ग्रामीण जिल्ह्यात चन्नरायपट्टणजवळील तेरा गावांमध्ये 1,777.2 एकर जमीन संपादित करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
या परिसरात एअरोस्पेसवर आधारित उद्योग सुरू करण्यात येणार असल्याचे मंत्री एम. बी. पाटील यांनी लेखी उत्तर दिले. सर्व कारखाने दक्षिणेतच गेले तर उत्तरेचा विकास कसा होणार? असा प्रश्न उपस्थित करीत बेळगावात इंडस्ट्रीयल कॉरिडॉर नाही. यासाठी जमिनीची गरज आहे. पालकमंत्र्यांशी चर्चा करून जमिनीसंबंधी निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगतानाच एम. बी. पाटील यांनी बेळगावात इंडस्ट्रीयल पार्क उभारणार असल्याचे जाहीर केले. बेळगाव, हुबळी-धारवाड, विजापूर परिसरात डिफेन्स कॉरिडॉर सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे, असेही उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी सांगितले.
धारवाड जिल्ह्यात 3 हजार एकरावर विकास
सध्या बेळगाव येथे एकस एसईझेड प्रा. लि. एअरोस्पेस कंपोनंट सुरू आहे.बेळगावात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी आहे. बेंगळूर-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर योजनेंतर्गत धारवाड जिल्ह्यात 3 हजार एकर जमिनीवर विकास करण्यात येत आहे. या परिसरात एअरोस्पेसवर आधारित कारखान्यांना आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यात येत आहेत. उत्तर कर्नाटकात एअरोस्पेसवर आधारित कारखाने सुरू करण्यासाठी कोणीही पुढाकार घेतल्यास त्यांना आवश्यक पाठिंबा देणार असल्याचेही उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी सांगितले.