तरुण शेतकऱ्यावर काळाचा घाला, शेतात गेला अन् विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला
सोमनाथ शिंदे यांच्या शेरी नावाच्या शिवारात विहिरीचे बांधकाम सुरू आहे
वडूज/पुसेगाव : जांब (ता. खटाव) येथील सोमनाथ संभाजी शिंदे (वय ४०) यांचा रविवारी २५ रोजी सकाळी शेरी नावाच्या शिवारात त्यांच्या मालकीच्या विहिरीच्या बाजूला काम करत असताना विजेचा तीव्र धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, मयत सोमनाथ हे सरपंच वनिता शिंदे यांचे पती होत.
सोमनाथ शिंदे यांच्या शेरी नावाच्या शिवारात विहिरीचे बांधकाम सुरू आहे. गेले चार दिवस परिसरात सातत्याने पाऊस पडत असल्याने विहिरीचे काम ठप्प होते. रविवारी २५ रोजी सकाळी शेतात फिरून येतो असे सांगून सोमनाथ शिंदे घराबाहेर पडले. मात्र संध्याकाळ झाली तरी ते घरी परतले नाहीत.
दिवसभर पाऊस सुरू असल्याने व त्यांचा फोनही लागत नसल्याने काळजीपोटी सोमनाथ यांची आई उषा व पत्नी वनिता शिवारात शेजारच्या शेतकऱ्यांकडे फोनवरून सोमनाथ यांच्याबाबत चौकशी करू लागल्या. शेतात विहिरीच्या बांधकामाचे काम सलग चार दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने अपूर्णावस्थेत राहिले होते.
शेतात विहिरीवर जाऊन बघून येतो असे घरी सांगून शेतात गेलेले सोमनाथ आजूबाजूला पडलेले साहित्य गोळा करत होते. यावेळी त्यांचा विजेच्या तारेला स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा धक्का बसला. यातच त्यांचा मृत्यू झाला. येथील सोसायटीचे सचिव व त्यांचे चुलत भाऊ रणजीत शिंदे यांना सोमनाथ विहिरीच्या बाजूला विजेचा धक्का लागून बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली.
रणजीत यांनी जोडीला गावातील शेतकरी घेऊन घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना व महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली. सोमनाथ यांचा विजेच्या तीव्र धक्क्याने जाग्यावरच मृत्यू झाल्याचे आढळून आले. पुसेगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, सोमनाथ शिंदे लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे शिवारातच बैलाने मारल्याने निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या आई उषा यांनी दुःखातून सावरत व सोमनाथ यांना हाताशी धरून संसार पुन्हा जोमाने उभा केला होता. सोमनाथ यांनीही लहान वयातच घरची जबाबदारी यशस्वीपणे पेलली होती. सकाळपासून शेतात ते आईबरोबर प्रचंड कष्ट करत होते.