लखनौमध्ये पोलीस कोठडीत तरुण व्यापाऱ्याचा मृत्यू
कुटुंबीयांकडून मारहाणीचा आरोप : तीव्र आंदोलन
वृत्तसंस्था/लखनौ
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका व्यापाऱ्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी तीव्र निदर्शने होत आहेत. रविवारी संतप्त कुटुंबीयांनी विभूतीखंड येथील मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर रास्तारोको करून आंदोलन केले. मृताची पत्नी, आई आणि इतर कुटुंबीयांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी पोलिसांनी आंदोलनादरम्यान कुटुंबीयांना रोखण्याचा प्रयत्न केला असता कुटुंबीयांनी गोंधळ घातला आणि घोषणाबाजी केली. सध्या या प्रकरणी चिन्हाटचे निरीक्षक अश्वनी कुमार चतुर्वेदी आणि इतरांविऊद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 32 वषीय व्यापारी मोहीत पांडे यांचा चिन्हाट पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाला होता. एका वादाच्या प्रकरणात पोलिसांनी मृत मोहित आणि त्याच्या मोठ्या भावाला ताब्यात घेतले होते.
याचदरम्यान मोहीतचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर वातावरण तत्प झाले आहे. पोलिसांनी मोहीतवर अत्याचार आणि मारहाण केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. याशिवाय पोलीस ठाण्यातच मोहीतचा मृत्यू झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मोहीतच्या मृत्यूनंतर लोहिया हॉस्पिटलमध्येच कुटुंबीयांनी गोंधळ घातला. त्याचवेळी लॉकअपच्या आतील सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यात मोहीत लॉकअपमध्ये झोपला असून मृताचा मोठा भाऊ असलेला दुसरा तऊण मसाज करत असल्याचे दिसत आहे. मृताच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या असून पोलीस स्थानक निरीक्षकाला बडतर्फ करण्याचा आग्रह धरला आहे. त्याशिवाय 50 लाखांची भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची मागणी कुटुंबीय करत आहेत.