For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तू तिथे मी

06:49 AM Dec 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
तू तिथे मी
Advertisement

विवाहवेदीवर सगळ्यांच्या साक्षीने उभं असताना ‘नांदा सौख्यभरे’ हा आशीर्वाद वधू-वरांना भांडा सौख्यभरे असा ऐकू येतो की काय असा प्रश्न पडावा इतकी भांडणं नंतरच्या आयुष्यात होत असतात. नवरा बायको हे नातंच अजब आहे! मग ते तुम्ही नवीन लग्न झालेल्या नवरा बायकोला विचारा, किंवा ज्यांच्या लग्नाला पन्नास वर्षे होऊन गेली आहेत अशा जोडप्याला विचारा. न भांडता दिवस कोणाचा जात नसेल. प्रश्न असा असतो की इतकं भांडण करूनही लोक एकत्र राहू कसे शकतात? तर एकामेकांशिवाय राहणे शक्य नाही असं हेच भांडणारे लोक तुम्हाला वर ठासून सांगतानाही दिसतील. या अजब गजब नात्याला नाव द्यावं तरी काय? त्याला नाव देण्यासाठीच विवाह सोहळा असतो. कालपर्यंत ज्याचं देवक आईवडील ठेवतात, तो नवरदेव किंवा ती नवरी एकदा का गळ्यात माळ पडली की दुसऱ्या कोणाचंही देवक ठेवू शकण्याचे अधिकार मिळवून दांपत्य म्हणून घ्यायला सज्ज होते. आहे की नाही कमाल या नात्यांची! सुरुवातीला अगदी नवकोरं असलेलं आणि एकमेकांची फारच काळजी करणारं हे नातं जसं जसं पुढे जाईल तसं मुरत जातं. तिला लढायचं असतं ते वेगळ्या फ्रंटवर. दोघेही आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळताना एकमेकांना वेळ देणे कमी करतात. त्याला कशाला तोंड द्यावं लागतं हे तिला कळत नाही. आणि आपल्या घरात नांदणाऱ्या आपल्या बायकोच्या अडचणी नक्की काय आहेत हे त्याला कळत नसतं. आणि मग या काटकोनांची काटाकाटी सुरू होते. आणि या सगळ्याचं प्रतिबिंब ‘तू तिथं मी’ या चित्रपटात आपल्याला दिसतं. अगदी सत्तरीच्या पुढे पोहचलेल्या आपल्या नवऱ्याची बालपणीची मैत्रीण त्याला भेटली आहे म्हटल्यावरती बायकोचा अगदी तिळपापड होतो. आणि सुना त्यावरून सासुबाईंची चेष्टा करतात म्हटल्यानंतर तर काही विचारायलाच नको! या चित्रपटामध्ये नवराबायकोच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या जोड्या दाखवल्यात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर असलेली नवरा बायकोची जोडी आणि तिचे नक्की एकमेकांविषयी काय विचार असतात, याचं हे सुंदर चित्र कितीही वेळा पाहिलं तरी समाधान होत नाही.

Advertisement

विवाह या गोष्टीच्या अगोदरच्या टप्प्यावर असलेली आणि ऑल टाइम हिट अँड फेवरेट असलेली प्रशांत दामले आणि सुप्रिया मेढेकर ही जोडी नवी जोडी म्हणून काय सुंदर शोभून दिसली आहे! या दोघांवर चित्रित झालेलं

युगायुगांचे नाते अपुले नको दुरावा

Advertisement

सहवासाची ओढ निरंतर नको दुरावा

हे रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं गाणं सुद्धा खूप गाजलं. या प्रेमी जोडीला एकत्र येण्यासाठी या तू तिथं मी चित्रपटाचे नायक नाही का अर्थात मोहन जोशी आणि सुहास जोशी हे पाठीशी उभे राहतात. मदत करतात. नात्यातले टप्पे आणि एकमेकांबद्दल वाटणारी ओढ ह्याचं विलक्षण परफेक्ट मिश्रण आहे हे! खरंतर हा चित्रपट म्हणजे एका कुटुंबाची कथा आहे. पण तो सारखा सारखा आठवण्याचं कारणच मुळी हे आहे, की पती-पत्नी या नात्याचे रंग किती गहिरे असतात, किती वेगळे असतात याचा जगताना इतक्या बारकाईने विचार नाही केला जात. परंतु ते नातं सर्वस्पर्शी असतं. आणि ते कसं अस्तित्वात असतं हे दाखवून देताना हा चित्रपट एकाएकी देश, चालीरीती किंवा वेळ या सर्वांच्या सीमा ओलांडून पलीकडे निघून जातो आणि वैश्विक होतो.

शोधीत गाव आलो स्वप्नात पाहिलेले

किती रंग जीवनाला व्यापून राहिलेले

कधी ऊन झेलले अन् कधी तृप्त चांदण्यात

साऱ्या ऋतूंत जपला हृदयातला वसंत

या गाण्याने हा चित्रपट संपतो खरं तर. पण या गाण्याआधीच जे कौटुंबिक वादळ या चित्रपटात दाखवलंय ते बघून आपण त्या चित्रपटाचे होऊन जातो. उतारवयातल्या माणसांना त्यांची मुलं गृहीत धरतात. त्या मुलांनाही जाणीव नसते की आपण आई-वडिलांना गृहीत धरतोय. आणि त्यात त्यांना त्रास होतोय. मूलत: आई वडील करतीलच किंवा आई-वडिलांना गृहीत धरणं ही आपली स्वाभाविक प्रवृत्ती असते. पण जेव्हा म्हातारपणी आई एकीकडे आणि वडील दुसरीकडे अशी वाटणी होते आणि त्यांना वेगळं राहायची वेळ येते तेव्हा कोणीच हा विचार करत नाही की म्हातारपणीही सोबतीची गरज असतेच की! उलट जास्त गरज असते. म्हातारपणीही स्पर्शाची गरज असतेच की! पण त्या स्पर्शाची जातकुळी बदललेली असते एवढंच. तरुण जोडप्याचा जोडपं म्हणून जसा विचार केला जातो तसा म्हाताऱ्या जोडप्याचा केला जात नाही हे दु:खच आहे आपल्या समाजाचं. त्या वयात त्या दोघांना कायम आपण एकमेकांसमोर असावं असं वाटत राहतं. कारण कोणाचे श्वास कधी थांबतील याचा भरवसा राहिलेला नसतो. दररोज रात्री झोपेतून उठून आपल्या जोडीदाराचा श्वास चालू आहे ना हे दोघेही बघत असतात. आणि दोघांनाही वाटत असतं की आपण पाहतो आहे हे समोरच्याला कळत नाही. पण तसं नसतं. भावनेच्या अशा फुटणाऱ्या टोकावर येऊन थांबलेलं हे नातं एक एक दिवसाचा सहवास मागत असतं. अशावेळी त्यांना वेगळं करणे यासारखं खरं तर दुसरं पाप नाही. पण नाइलाजापोटी का होईना, काहीवेळा ते घडत असतं. आणि ज्या वेळेला वेगळं राहण्याची वेळ येते तेव्हा त्या ज्येष्ठ जोडप्याला काय वाटतं हे सांगणं म्हणजेच हा चित्रपट.

मध्यम वयात संसाराच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत या आजीआजोबांची मुलं व्यग्र असतात. आणि त्यांच्या आवश्यक गरजांपोटी दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची गरज निर्माण होते. मुलांना मदत करावी, नातवंडांचे लाड करावे असं कुठल्या आजी-आजोबांना वाटणार नाही? पण त्यांचं एकच म्हणणं असतं. आम्हाला कुठेही राहू द्या. तुमच्यासोबत नाही ठेवलं तरी चालेल. अगदी घरातसुद्धा नाही ठेवलं तरी चालेल. पण जिथे कुठे ठेवाल तिथे एकमेकांची सोबत आम्हाला असू द्या. आम्ही म्हातारे झालो म्हणजे आम्ही निरुपयोगी किंवा मशीन झालेलो नाही. माणसंच आहोत. आम्हालाही एकमेकांच्या सहवासाची ओढ असते. आम्ही म्हातारे होतो नातं म्हातारं होत नसतं. उलट ते अधिकाधिक परिपक्व आणि समजूतदार झालेलं असतं. हे ओळखायला मुलांची पिढी कमी पडते. त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा चित्रपट आहे. दोन मुलांकडे दोघे जण राहताना एका संवादासाठी सुद्धा दोघांना वेळ दिला जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. आणि बोलता बोलता, आठवणी काढता काढता कधी त्यांना रडू फुटतं हे त्यांचं त्यांनाच कळत

नाही.

त्यांचे हे हाल त्यांच्या मैत्रिणीला बघवत नाहीत. आणि त्यांची मैत्रीण म्हणजेच या चित्रपटाची दिग्दर्शिका स्मिता तळवलकर शेवटी त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी काय करते हे आपल्याला प्रत्यक्ष चित्रपटातच पहावं लागेल. पण नवरा बायकोच्या नात्याचे वेगवेगळे पदर एकसारखे आठवावेत किंवा यावर विचार करून बघावा असं वाटतं. कारण लग्नसराईचे दिवस आहेत. विवाहवेदीवर उभ्या असलेल्या त्या नव्या जोडप्याकडे पाहिलं की असा एखादा सुंदर चित्रपट आपोआपच डोळ्यांना सामोरा येतो. आणि परमेश्वराने या जगात त्या जोडप्याच्या बरंच आधी पाठवल्याच्या क्रेडिटवर त्यांना मन भरून आशीर्वाद द्यावासा वाटतो की ‘नांदा सौख्यभरे’!

- अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.