महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

तुम्ही देवांना संतुष्ट करा, देव तुम्हाला संतुष्ट करतील

06:13 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

आपले परमपिता असलेले बाप्पा आपल्याला आईच्या मायेने समजावून सांगून, सावध करतायत. ते म्हणतायत, अरे माझ्यासाठी माणसाने केलेली कर्मे त्याला कधीही बंधनकारक होत नाहीत. मात्र मनुष्य मनात कर्मफलाची वासना ठेऊन त्याच्या इच्छेनुसार किंवा त्याला करावंसं वाटतंय म्हणून कर्म करतो. असं केलं की, तो बंधनात अडकतो आणि हे बंधनच त्याच्या पुनर्जन्मास कारणीभूत होते. मी प्रत्येकाला कामे नेमून देत असतो. ही कामे त्यांच्या पूर्वकर्मानुसार त्यांच्या वाट्याला आलेली असतात. प्रत्येकाचा उद्धार व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्यादृष्टीने त्यांचे कर्मबंधन तुटण्यासाठी त्यांच्या हातून कर्मयोगाचे आचरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी माझी अशी अपेक्षा आहे की, वाट्याला आलेले काम प्रत्येकाने काहीही कुरकुर न करता आणि निरपेक्ष भावनेने करावे आणि मला अर्पण करावे. ह्यातील महत्त्वाची गोष्ट अशी की, माझी कितीही इच्छा असली आणि मी कितीही समजावून सांगितलं तरी एखाद्या माणसाचा उद्धार मी करू शकत नाही.

Advertisement

ज्याप्रमाणे शिक्षकांनी कितीही जीव तोडून शिकवलं तरी परीक्षेचे पेपर विद्यार्थ्याने स्वत:च लिहायचे असतात त्याप्रमाणे माणसाने स्वत:चा उद्धार होण्याच्या दृष्टीने स्वत:च प्रयत्न करायचे असतात. प्रत्येकाला नेमून दिलेले काम हे त्याच्या दृष्टीने पवित्रच आहे म्हणजे एकप्रकारे ते यज्ञकर्मच आहे. ते त्याने निरपेक्षतेनं आणि अपेक्षेबरहुकुम केलं की, देवता प्रसन्न होतात आणि या प्रसन्न झालेल्या देवता स्वर्गातील कल्पवृक्ष ज्याप्रमाणे जे मागेल ते देत असतो त्याप्रमाणे तुमच्या ज्या इच्छा तुमचं भलं करणाऱ्या असतात त्या सर्व अवश्य

पुरवतात.

सुरांश्चान्नेन प्रीणध्वं सुरास्ते प्रीणयन्तु व ।

लभध्वं परमं स्थानमन्योन्यप्रीणनात्स्थिरम् ।।11।।

अर्थ-याप्रमाणे तुम्ही देवांना संतुष्ट करा, देव तुम्हाला संतुष्ट करोत. एकमेकांचा संतोष केल्याने शाश्वत व श्रेष्ठ असे स्थान तुम्हाला मिळेल.

विवरण-बाप्पा म्हणतात, मी आधीच्या श्लोकात सांगितलंय तसं इतर कोणतीही गोष्ट मनात न आणता मी दिलेलं काम माझं समजून कर्मफळाच्या अपेक्षेशिवाय पूर्ण करा. यामुळे देवता संतुष्ट होतील व त्या तुम्हालाही संतुष्ट करतील असाच जीवनक्रम ठेवा. एकमेकांना संतुष्ट ठेवल्याने शाश्वत व श्रेष्ठ असे स्थान तुम्हांला मिळेल. भगवद्गीतेतील तिसऱ्या अध्यायात श्रीकृष्णानेही निरपेक्षतेने कर्मे करणाऱ्यांना कैवल्यपद मिळेल असं आश्वासन दिलेलं आहे.

म्हणूनि नित्य निसंग करी कर्तव्य कर्म तू ।

निसंग करिता कर्म कैवल्य-पद पावतो  ।।3.19।।

पुढं बाप्पा म्हणतायत, इष्ट देवतांचे पूजन केल्यावर त्या प्रसन्न होऊन प्रसाद देतील. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून काही भाग त्यांना अर्पण करावा.

इष्टा देवा प्रदास्यन्ति भोगानिष्टान्सुतर्पिता ।

तैर्दत्तांस्तान्नरस्तेभ्योदत्वा भुत्ते स तस्कर ।।12।।

अर्थ-ज्यांचे यजन केले आहे व उत्तम प्रकारे ज्यांची तृप्ती केली आहे असे देव तुम्हांला इष्ट भोग देतील. त्यांनी दिलेले ते भोग जो मनुष्य त्यांना दिल्यावांचून भोगतो तो चोर होय.

विवरण-बाप्पा म्हणतायत, देवांनी संतुष्ट होऊन प्रसाद स्वरूपात जे भोग आपल्याला दिले आहेत, त्यातलेच काही पुन्हा कृतज्ञता म्हणून देवाला अर्पण करा. हे अर्पण करणं गोरगरिबांना दान करूनसुद्धा साधता येतं. असं न करता देवांनी दिलेलं सर्व आपणच खाणं योग्य नाही. त्यांची वर्तणूक चोरासारखीच असते म्हणून त्यांना चोर समजावं. बाप्पा इथं सर्वसमावेशक संस्कृती कशी असते आणि तिचं रक्षण कसं करावं ते समजावून देतायत.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article