For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परमपद मिळवून देणारी साधी आणि सोपी दिनचर्या

06:30 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
परमपद मिळवून देणारी साधी आणि सोपी दिनचर्या
Advertisement

अध्याय दुसरा 

Advertisement

बाप्पा म्हणाले, प्रत्येकाला नेमून दिलेले काम हे त्याच्या दृष्टीने पवित्र यज्ञकर्मच आहे. ते त्याने निरपेक्षतेनं आणि अपेक्षेबरहुकुम केलं की, देवता प्रसन्न होतात आणि या प्रसन्न झालेल्या देवता स्वर्गातील कल्पवृक्ष ज्याप्रमाणे जे मागेल ते देत असतो त्याप्रमाणे तुमच्या ज्या इच्छा तुमचं भलं करणाऱ्या असतात त्या सर्व आवश्य पुरवतात. याप्रमाणे कर्तव्यकर्म करून तुम्ही देवांना संतुष्ट करा, देव तुम्हाला संतुष्ट करतील. एकमेकांचे समाधान केल्याने शाश्वत व श्रेष्ठ असे स्थान तुम्हाला मिळेल. इष्ट देवतांचे पूजन केल्यावर त्या प्रसन्न होऊन प्रसाद देतील. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून काही भाग त्यांना अर्पण करा. हे अर्पण करणं गोरगरिबांना दान करून सुद्धा साधता येतं. असं न करता देवांनी दिलेलं सर्व आपणच खाणं योग्य नाही. त्यांची वर्तणूक चोरासारखीच असते. म्हणून त्यांना चोर समजावं. बाप्पा इथं सर्वसमावेशक संस्कृती कशी असते आणि तिचं रक्षण कसं करावं ते समजावून देतायत. जगातली कुठलीही संस्कृती अभ्यासली तर त्यात असं आढळेल की, आपल्यावर उपकार करणाऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याला सर्वोच्च प्राधान्य असतं. त्यामुळे आपापसातील बंधुभाव जागृत राहतो व अडीअडचणीच्यावेळी तुमच्यावरील प्रेमाखातर लोक मदतीला येतात. म्हणून आपल्याला मिळालेल्यातला काही भाग इतरांना अर्पण करून उरलेला भाग आपण केलेल्या कर्तव्यरुपी यज्ञाचा प्रसाद म्हणून भक्षण करावा. इतकं सांगूनसुद्धा बाप्पांचे सांगणे न पटल्यामुळे त्यांचे न ऐकणारे महाभाग समाजात असतातच. त्यांची संभावना करताना बाप्पा पुढील श्लोकात सांगतात, जे शिजवलेलं सर्व स्वत:च खातात ते पापच भक्षण करत असतात.

 हुतावशिष्टभोक्तारो मुक्ता स्यु सर्वपातकै ।

Advertisement

अदन्त्येनो महापापा आत्महेतो पचन्ति ये ।। 13 ।।

अर्थ- हवनाचा अवशिष्ट सेवन करणारे सर्व पातकांपासून मुक्त होतात. जे स्वत:करिता अन्नाचा पाक करतात ते महापापी पाप भक्षण करतात. विवेचन- यज्ञात देवांना हवन केल्यावर जे अन्न उरतं ते खाणारे लोक सर्व पापापासून मुक्त होतात. याउलट शिजवलेलं सर्व अन्न स्वत:च खाणारे स्वार्थी लोक अन्न नव्हे तर पापच भक्षण करत असतात. त्यामुळे त्यांच्या पापात भरच पडत जाते. अशा लोकांवर बाप्पा नाराज झाल्यामुळे त्यांना उत्तरोत्तर खालच्या योनीत जन्म मिळत जातो. ईश्वराने माणसाला दिलेलं काम हे त्यानं कर्तव्य म्हणून करावं. कर्तव्य पार पाडलं की, देवता प्रसन्न होऊन त्याच्यासाठी कल्पवृक्ष बनतील. त्याच्या हिताचं जे असेल ते त्याला देऊ करतील व शेवटी परमपद मिळवून देतील. पुढं बाप्पा म्हणतात, मनुष्याने शिजवलेल्या अन्नाचा देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर गरजूंना त्यातील थोडं देऊन मग प्रसाद समजून उर्वरित भाग भक्षण करावा. जो इतरांचा वाटा त्यांना न देता स्वत:च खात असेल तो चोर समजावा. परमपद मिळण्यासाठी इतकी साधी आणि सोपी दिनचर्या माणसाने पाळावी अशी ईश्वराची अपेक्षा आहे पण स्वत:च्या बुद्धीने त्यात अनिष्ट बदल करून मनुष्य त्याच्या भविष्यात माती कालवत असतो.

आपण सर्व प्राणीमात्र ईश्वराची लेकरे आहोत. साहजिकच त्यांना आपल्या सर्वांची काळजी असते. म्हणून आपण संपूर्ण त्याच्यावर टाकून निर्धास्त असावे. अर्थात हे त्यालाच जमते जो स्वत:ला कर्ता न समजता ईश्वर कर्ता आहे ह्यावर ठाम विश्वास बाळगतो. आपल्याला वेळेवर अन्नपाणी कसे मिळेल ह्याची चोख व्यवस्था ईश्वराने केलेली आहे. ह्याची जाणीव असलेले भक्त म्हणतात, ज्याने चोच दिलेली आहे तो चारा देतोच. ईश्वराने माणसाच्या उपजीविकेसाठी अन्नसाखळी तयार केलेली आहे ती कशी काम करते ते बाप्पा आपल्याला पुढील श्लोकात सांगत आहेत.

क्रमश:

Advertisement
Tags :

.