For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संस्थेचे खरे मालक तुम्हीच, आम्ही फक्त विश्वस्त!

10:50 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
संस्थेचे खरे मालक तुम्हीच  आम्ही फक्त विश्वस्त
Advertisement

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक किरण ठाकुर यांचे प्रतिपादन :  मुंबई विभागाकडून एक हजार कोटी गुंतवणुकीचा टप्पा पार

Advertisement

मुंबई : लोकमान्य टिळक नेहमी म्हणत की, ‘आधी स्वराज्य मग सुधारणा.’ टिळकांना देश सुजलाम् सुफलाम् करायचा होता. ते ध्येय आम्ही बाळगत असून त्यातून लोकमान्य सोसायटीची पहिली शाखा टिळकवाडीत सुरू केली. तर 100 वी शाखा पुण्याच्या टिळकवाड्यात सुरू केली. ही संस्था जनतेच्या मालकीची असून तुम्ही सगळे मालक आहात, आम्ही फक्त विश्वस्त आहोत, असे प्रतिपादन लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक किरण ठाकुर यांनी केले. मुंबई विभागाकडून एक हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा टप्पा नुकताच पार केला. या निमित्ताने बोरीवली येथे आयोजित केलेल्या आनंद सोहळ्यात ते बोलत होते. मुंबई विभागातील उपनगरांतील बोरीवली पश्चिम, बोरीवली पूर्व, चारकोप आणि वसई चार शाखांचा संयुक्तिक कार्यक्रम होता. यावेळी संस्थेच्या कार्याची माहिती सांगणारा माहितीपट दाखविण्यात आला. व्यासपीठावर लोकमान्य संस्थेचे संस्थापक किरण ठाकुर, रिजनल मॅनेजर रमेश शिरसाट, असिस्टंट रिजनल मॅनेजर अतुल परब, संचालक पंढरी परब, ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेते प्रभाकर सावंत, गायिका अर्चना कन्हेरे आदी मान्यवर उपस्थित होते. संचालक पंढरी परब यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. लोकमान्य संस्थेने गुंतवणुकीचा एक हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला. त्याचे सर्व श्रेय हे आपल्या सहकाऱ्यांचे असल्याचे सांगत किरण ठाकुर यांनी ठेवीदारांशी संवाद साधला.

माझे वडील बाबुराव ठाकुर हे लोकमान्य टिळक यांचे अनुयायी होते. त्यांनी चार वेळा तुऊंगवास भोगला. ‘चले जाव’च्या चळवळीत भूमिगत राहून काम केले. वडिलांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मोठे होते. त्यांनी 1937 साली बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समिती स्थापन केली. त्याचवेळी बेळगाव जिल्ह्यात 180 प्राथमिक शाळा सुरू केल्या. त्यात मराठी, कानडी आणि उर्दू अशा शाळांचा समावेश होता. या शाळा 1966 पर्यंत चालवल्या. या शाळांमुळे शिक्षकांचाही फायदा झाला. त्यांना शिकवण्यासाठी टीचर ट्रेनिंग कॉलेज उघडलं. हे मुंबई इलाखामधील त्यावेळचे पहिले कॉलेज होते. गोवामुक्ती लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो याचे नेतृत्व केले. लोकमान्यकडून विविध सामाजिक आणि सेवाभावी संस्थांना 50 कोटीपेक्षा जास्त देणग्या दिल्या आहेत. गेली 20 वर्षे शिवजयंतीसाठी 25 लाखांची बक्षिसे दिली गेलीत तर गणेशोत्सवासाठी 50 लाखांची बक्षिसे दिली जातात. टिळकांच्या शिकवणीप्रमाणे हिंदू एकवटण्यासाठी हे सुरू आहे. शिवाय लोककल्प फाऊंडेशन सुरू केले असून यातून खेड्यापाड्यांतील कुटुंबांचे उत्पन्न वाढवायचे आहे. युरोपमधील खेडी प्रगत झाली, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्र सुधारण्यासाठी अनेक कॉलेजीस काढली. बॅरिस्टर नाथ पै यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सुरू करायचे आहे. बाबुराव ठाकुर यांच्या नावाने कौशल्य विद्यापीठ (स्किल युनिव्हर्सिटी) सुरू करण्याचा मानस आहे. हजारो लोकांना रोजगार मिळावा, उपजीविकेचे साधन मिळावे, लाखो लोक समाजाच्या मुख्य प्रवाहात यावेत यासाठी नवनवीन प्रयत्न आम्ही करत असल्याचे किरण ठाकुर यांनी सांगितले. तसेच ठेवीदार आणि गुंतवणूकदारांनी जो विश्वास  दाखवला त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी शाखा व्यवस्थापक आणि कर्मचारी यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. यात बोरीवली पूर्व शाखा, बोरीवली पश्चिम शाखा, वसई शाखा तसेच चारकोप शाखा व्यवस्थापक यांचा सन्मान किरण ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच निवेदक विघ्नेश जोशी यांचाही सन्मान करण्यात आला.

Advertisement

ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर सावंत यांची सभासद होण्याची इच्छा 

कार्यक्रमावेळी ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर सावंत यांनी सोसायटीचा सभासद होण्याची इच्छा व्यक्त केली. सावंत म्हणाले की, मी लोकमान्यशी निगडित आहे. मात्र येथील भरभराट पाहून सोसायटीचा सभासद होण्याची माझी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

‘स्वरांचे चांदणे’ मैफल

लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीने एक हजार कोटी गुंतवणुकीचा टप्पा पार केल्याने ‘स्वरांचे चांदणे’ मैफलीचे आयोजन केले होते. रसिकांसाठी ही संगीत पर्वणी ठरली. यात इंडियन आयडॉल 12 चे विजेते गायक नचिकेत लेले आणि गायिका मधुरा कुंभार यांनी गाणी सादर केली.

Advertisement
Tags :

.