For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कडक ऊन्हातही शांततेत 75 टक्के मतदान

12:01 PM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
कडक ऊन्हातही शांततेत 75 टक्के मतदान
Advertisement

सर्वाधिक 87 टक्के पर्येत, सर्वात कमी 67 टक्के पणजीत 4 जून रोजी मतमोजणी : दोन्ही ठिकाणी भाजपच : मुख्यमंत्र्यांचा दावा

Advertisement

पणजी : गोव्यात काल मंगळवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्स्फूर्त 75 टक्के एवढे मतदान अत्यंत शांततापूर्ण आणि उत्साहात झाले. सायंकाळी 6 वा. मतदान संपुष्टात आल्यानंतर सर्व सील केलेली इलेक्ट्रॉनिक मशिन्स तालुका पातळीवर कडक सुरक्षा बंदोबस्तात पाठविण्यात आली. रात्री उशिरा उत्तर गोव्यातील मशिन्स डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सुरक्षित लॉकर्समध्ये बसविण्यात आली. दक्षिण गोव्यातील मशिन्स मडगावात ठेवण्यात आली. सर्वाधिक 87 टक्के मतदान उत्तर गोव्यात पर्ये येथे, तर सर्वात कमी मतदान पणजीत झाले. निवडणुकीस उभे राहिलेल्या 16 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीमध्ये सील झाले आहे. दि. 4 जून रोजी सकाळी 8 वा. मतमोजणीला प्रारंभ होईल. मतदानात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. भारतीय जनता पार्टीचे नेते तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दोन्ही मतदारसंघांतून भाजपचेच उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असा दावा केला.

सकाळी 7 वा. मतदानास सुऊवात झाली. सलग 11 तास म्हणजे सायंकाळी 6 वा.पर्यंत चालू होते. पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी 9 पर्यंत दोन्ही लोकसभा मतदारसंघांत मिळून सरासरी 13 टक्के मतदान झाले होते. ही टक्केवारी नंतर हळूहळू वाढत गेली. नंतरच्या दोन तासात म्हणजे सकाळी 11 वा. पर्यंत दोन्ही ठिकाणी सरासरी 30 टक्के मतदानाची नोंद झाली होती. दुपारी 1 वा.पर्यंत सरासरी 50 टक्के मतदान झाले होते. पुढे दुपारी 3 वा. सुमारे 62 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. सायंकाळी 5 वा. सरासरी 73 टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतरच्या एक तासात म्हणजे सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी वाढून शेवटी अंदाजे 75 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

सुरळीतपणे झाले मतदान

उत्तर गोवा मतदारसंघात या प्रतिनिधीने फेरफटका मारला असता भल्या मोठ्या रांगा तशा कुठेच दिसल्या नाहीत. काही ठिकाणी किरकोळ तर अनेक ठिकाणी बऱ्यापैकी रांगा दिसून आल्या. ठराविक अंतराने मतदार येत राहिले आणि मतदान सुरळीतपणे होत राहिले. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांना बसण्यासाठी लहान मंडपांची उभारणी करण्यात आली होती तसेच शीतपेय, पाणी, कुलर यांची व्यवस्था अनेक केंद्रांवर झाल्याचे दिसून आले.

ऊन असतानाही चांगले मतदान

अतिवृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी ‘व्हिल चेअर्स’ची सोय अनेक मतदान केंद्रांवर करण्यात आली होती. त्यामुळे मतदारांची चांगली व्यवस्था झाल्याचे दिसून आले. ऊन असतानाही अनेक मतदारांनी दुपारच्या वेळी मतदान केले.

सत्तरीत श्रीपादभाऊंना 30 हजारांची आघाडी?

पर्ये मतदारसंघात पहिल्यांदाच विक्रम गाठलेला आहे. या मतदारसंघात 87 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात मतदान झालेले आहे. पर्ये व वाळपई हे दोन्ही मतदारसंघ डॉ. दिव्या राणे व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आहेत. सत्तरीतील या दोन्ही मतदारसंघांत मिळून 30 हजार मतांची आघाडी श्रीपाद नाईक यांना राणे पती-पत्नी मिळवून देत एक नवा विक्रम गोव्यात स्थापन करीत आहेत.

राजकीय नेत्यांनी केले मतदान

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोठंबी येथील मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या पत्नीने देखील मतदानात भाग घेतला. उत्तर गोवा भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांनी सापेद्र, ओल्ड गोवा येथे आणि दक्षिण गोवा भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांनी पणजीतील आल्तीनो केंद्रावर कुटुंबियांसमवेत मतदान केले. उत्तर गोवा काँग्रेस उमेदवार अॅड. रमाकांत खलप यांनी म्हापसा येथे आल्तीनो केंद्रावर पत्नीसह मतदान केले. भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी पिर्ण येथे मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी पत्नीसह रवींद्र भवन, कुडचडे येथील मतदान केंद्रावर मतदानाची नोंद केली. गोवा मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी देखील मतदानाचे कर्तव्य पार पाडले. विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी पत्नीसह कुंकळ्ळी येथे मतदान नोंदवले. मंत्री रोहन खंवटे यांनी कुटुंबासमवेत पर्वरी येथील मतदान केंद्रावर मतदान केले. पेडणे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पत्नीसह तर ताळगांवच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी त्यांच्या निवास क्षेत्रातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा तसेच आरजीपीचे उत्तर गोवा लोकसभा उमेदवार मनोज परब यांनी मतदानाचे कर्तव्य निभावले. उमेदवार, आमदारांनी, नेत्यांनी आपापल्या क्षेत्रातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाची जबाबदारी पार पाडली.

तृतीय पंथीने बजावला हक्क

मधू गुप्ता या तृतीयपंथी व्यक्तीने सांताव्रुझ येथील मतदान केंद्रावर प्रथमच मतदान केले. मतदान करणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे आणि आम्हाला आमच्या आवडीचा नेता निवडण्याचा अधिकार आहे. निवडणूक यादीत आमचा समावेश करण्यात आल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे, असे मधु गुप्ता यांनी सांगितले. मडगाव, वास्को, पणजी आणि कळंगुट या प्रमुख शहरांत मिळून राज्यात 9 तृतीयपंथी मतदारांची नोंदणी केली आहे.

श्रीपादभाऊ विसरले ओळखपत्र

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक हे मतदानासाठी गेले खरे परंतु ते ओळखपत्र नेण्यास विसरले. त्याची विचारणा केल्यानंतर ते ओळखपत्राचा पुरावा दाखवू शकले नाहीत. शेवटी उमेदवार म्हणून त्यांना देण्यात आलेले कार्ड ओळखपत्र पुरावा या नात्याने ग्राह्य धऊन त्यांना मतदानाची अनुमती देण्यात आली.

 आपला विजय निश्चित आहे : खलप

उत्तर गोवा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी कार्यकर्ते झटत आहेत, शिवाय राज्यातील विद्यमान व काही माजी आमदार मंडळीचा छुपा पाठिंबा असल्याने, आपला विजय निश्चित असल्याचे मत काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांनी मांद्रेत व्यक्त केले.

दोन्ही जागा भाजपच जिंकणार : मुख्यमंत्र्यांचा दावा, जनतेचे मानले आभार

देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात झालेल्या अकरा राज्यांच्या मतदानापैकी आसाम राज्यानंतर गोवा राज्यात द्वितीय क्रमांकाचे सर्वाधिक मतदान झाले. यंदा मतांची टक्केवारीही वाढल्याने गोमंतकीय जनतेने ‘विकसित भारत, विकसित गोंय’ यासाठीच 75 टक्क्यांहून अधिक मतदान केल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. राज्यातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे केलेले मतदान व निवडणूक आयोगाने प्रत्येक केंद्रावर पुरवलेल्या सोयी-सुविधा याविषयीही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी त्यांचे आभार मानून कौतुकही केले. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेने आभार मानले. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गेल्या काही लोकसभा निवडणुकांमध्ये 70 ते 72 टक्के मतदान राज्यात झाले होते. यंदा मतांची टक्केवारी वाढून अंदाजित 75 टक्क्यांहून अधिक मतदान झालेले आहे. गोमंतकीय जनतेने उत्स्फूर्तपणे मतदान केल्याने हे मतदान भाजपसाठीच झाले असून, दक्षिण व उत्तर गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

आमोणेतील पर्यावरणपूरक केंद्र आकर्षित

आमोणा येथील एका मतदान केंद्रावर नैसर्गिक वनस्पती व फळे वापरून माटोळी तयार करण्यात आली होती. तसेच या ठिकाणी विविध झाडे व फळे यांच्या सहाय्याने पर्यावरणपूरक मतदान केंद्र म्हणून आमोणा आकर्षित ठरले. त्यांचे मी विशेष कौतुक करतो, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

तानावडे यांच्याकडून गोमंतकीय जनतेचे आभार

गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी गोव्यातील जनतेने भारतीय जनता पक्षासाठी जे मोठ्या प्रमाणात मतदान केलेले आहे त्याबद्दल आपण आभार मानतो, असे निवेदन केले. तसेच राज्यातील जनतेचे, भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचेही आभार मानले व कृतज्ञता व्यक्त केली. गोमंतकातील जनतेने केलेले मतदान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवून केलेले आहे. आमचे गोव्यातील दोन्ही उमेदवार चांगलेच आहेत. परंतु नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी केलेले हे अत्यंत महत्त्वाचे मतदान आहे व दोन्ही ठिकाणी भाजप उत्स्फूर्त व सर्वाधिक मतांनी विजयी होईल, असा दावा तानावडे यांनी केला. भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी, आमदारांनी तसेच मंत्र्यांनी व  मुख्यमंत्र्यांनी जे अथक कार्य केले त्यामुळेच सर्वांच्या मदतीने गोव्यात दोन्ही ठिकाणी भाजपचा विजय झालेला आहे, असे तानावडे म्हणाले.

लक्ष्मण पराडकर यांचा असाही एक विक्रम

सांखळी मतदारसंघातील एक उद्योजक आणि भाजपचे समर्थक असलेल्या लक्ष्मण पराडकर यांनी आजवर कुडणे सांखळी येथील मतदान केंद्र क्र. 20 वर जाऊन प्रथम क्रमांकाचे मतदान करणे कधीही सोडले नाही. 1993 पासून आपण मतदान करीत आलेलो आहे. सदानंद मळीक हे तेव्हा उमेदवार होते, त्यांच्या आग्रहाखातर एकदाच आपण त्यांना प्रथम मतदान करण्यासाठी मागे सरलो अन्यथा आपण कधीही पहिल्या क्रमांकाचे मतदान सोडले नाही. मंगळवारी पहाटे 4.45 वा. जाऊन मतदान केंद्राच्या बाहेर बसलो आणि सकाळी 7 वा.च्या ठोक्याला आपण मतदान करणारा पहिला मतदार ठरलो, असे त्यांनी दै. ‘तऊण भारत’ला सांगितले.

श्रीपादभाऊंना मिळणार एक लाखाची आघाडी

उत्तर गोव्यातील सत्तरी आणि डिचोली तालुक्यात झालेल्या बंपर मतदानामुळे श्रीपाद नाईक यांची आघाडी सुमारे एक लाख मतांची होईल, असा अंदाज आहे. सत्तरीत 30, 000 तर डिचोली तालुक्यात सुमारे 22,000 एवढी आघाडी श्रीपाद नाईक यांना मिळणार, असा प्राथमिक अंदाज आहे.

मुख्यमंत्र्यांचा मडगावात तळ

मुख्यमंत्र्यांनी दक्षिण गोव्यात कोणत्याही परिस्थितीत आघाडी मिळवायची आणि भाजपला विजय प्राप्त करून द्यायचा, असा निर्धारच केला आणि त्यानुसार त्यांनी गेले दोन महिने मडगाव व संपूर्ण दक्षिण गोवा अक्षरश: पिंजून काढला. प्रत्यक्ष मतदानादिवशी काल मंगळवारी उत्तरेची जबाबदारी प्रदेश भाजप अध्यक्ष खासदार सदानंद तानावडे यांच्यावर सोपविली आणि स्वत: दक्षिण गोव्यात मडगाव येथे जाऊन मुक्काम ठोकला. सकाळी कोठंबी-पाळी येथे स्वत: मतदान केल्यानंतर ते मडगावला रवाना झाले आणि तिथून त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आणि मिशन दक्षिण गोवा ही मोहीम फत्ते केली.

Advertisement
Tags :

.