मिश्र बोलूनि बुद्धीस जणू मोहात टाकसी
अध्याय तिसरा
दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेली आत्मज्ञान आणि बुद्धियोगाची माहिती अर्जुनाने ऐकली. अर्थातच अजूनही त्याच्या मनाचे समाधान झालेले नसल्याने युध्द न करण्याचा त्याचा निर्णय तसाच होता. आता भगवंतांना त्यांच्याच बोलण्यात अडकवावे म्हणून त्याने भगवंतांना विचारले, “हे जनार्दना! कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे असे तुमचे मत आहे, तर मग हे केशवा, मला कौरवांशी युद्ध करून त्यांना मारण्याचे घोर कर्म का करावयास लावता?”
बुद्धि कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना । मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा ।।1।।
वास्तविक पाहता भगवंतांनी नुसते बुद्धी न म्हणता समबुद्धी असा शब्द वापरला होता. ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते निरपेक्षपणे करणे म्हणजे समबुद्धिने कर्म करणे होय. ह्यामध्ये स्वार्थाचा लवलेश नसल्यामुळे माणसाच्या हातून उचित पद्धतीने योग्य कर्म होते असं भगवंताना सांगायचं होतं परंतु अर्जुनाने समबुद्धी ऐवजी नुसताच बुद्धी हा शब्द घेतला. ज्या माणसाला समोरच्या माणसाशी वाद घालायचा असतो, तो असंच समोरच्या माणसाचं बोलणं नीट समजून न घेता त्याच्या बोलण्यातील काही भाग घेऊन त्यातून काही विपरीत अर्थ काढून आपलेच म्हणणे कसे बरोबर आहे हे सांगत असतो. अर्जुन नेमके हेच करत होता. ह्याला एखाद्याच्या बोलण्याचा विपर्यास करणे असे म्हणतात.
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुनाने भगवंतांना असे विचारले की, हे देवा! तुम्ही जे काही बोललात, ते मी लक्षपूर्वक ऐकले. श्रीअनंता, तुम्ही ह्यापूर्वी सांगितलेल्या आत्मज्ञानाचा विचार केला असता कर्म आणि त्याचा कर्ता, हे उरतच नाहीत तर मग श्रीकृष्णा, मला युद्ध कर असं का म्हणता. तुम्हीच तर कर्माला बुद्धीपेक्षा कमी लेखता मग माझ्याकडून हे हिंसात्मक कर्म का करवून घेत आहात? या दोन्ही गोष्टींचा मेळ कसा घालावा. पुढील श्लोकात अर्जुन म्हणतो, आपल्या ह्या घोटाळ्यात टाकणाऱ्या, दुट्टपी वचनामुळे माझ्या बुद्धिला भ्रम झाला आहे. तरी जे केल्याने माझे हित होईल असे एक निश्चित काय ते सांगा.
मिश्र बोलूनि बुद्धीस जणू मोहात टाकिसी । ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ।। 2 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुनाने पुढे विचारले, देवा! तुम्हीच जर असे संदेह उत्पन्न होणारे विचार बोलू लागलात, तर आमच्यासारख्या अज्ञानी लोकांनी काय करावे? आता विवेकाची गोष्टच संपली असं म्हणावं लागेल? वैद्याने प्रथम रोग्याला औषध देऊन, काय खावे, काय खाऊ नये, हे पथ्य सांगावे आणि नंतर जर त्याने रोग्यास विष दिले तर तो रोगी कसा वाचणार? अहो! मला आधीच काही समजेनासे झाले आहे, त्यात मी मोहाच्या चक्रात अडकलो आहे, म्हणून हे कृष्णा! खरे काय आणि खोटे काय, कसे वागले की, माझे भले होईल ही गोष्ट तुम्हाला विचारली आहे पण तुमचे एकेक पहावे, ते सर्वच आश्चर्य! आम्ही शरीराने, मनाने व जीवाभावाने तुमच्यावर विश्वास ठेवावा आणि तुम्हीच जर असे गैरसमज निर्माण करणारे बोलू लागलात तर सगळे काही संपलेच म्हणायचे, आता अशाच प्रकारे उपदेश करणार असाल, तर मग आमचे चांगलेच कल्याण करता म्हणावयाचे!
अर्जुनाच्या अशा उपरोधिक बोलण्याचे आपल्याला आश्चर्य वाटते. भगवंत त्याच्या कल्याणाचे सांगत असताना हा असा उद्धटपणाने देवांशी का बोलतो आहे असेही मनात येते. त्यावर खुलासा असा की, अर्जुन आणि भगवंत हे गुरुशिष्य खरे पण अर्जुन भगवंतांची सख्यभक्ती करत असे आणि सख्यभक्तीमध्ये असे अरेतुरेचे बोलणे चालतेच.
क्रमश: