रवींद्र चव्हाण-नीलेश राणे ‘सत्तासंघर्षा’त विजय कुणाचा?
कोकणचे नेते नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकीय केंद्रबिंदू मानले जाते. 1990 साली ते सर्वप्रथम आमदार झाले. त्यानंतर 2024 पर्यंत सिंधुदुर्गात जेवढ्या निवडणुका झाल्या, त्या सर्व नारायण राणे या नावाभोवतीच फिरत राहिल्या. राणेंमुळे सुरुवातीच्या काळात ‘शिवसेना विरुद्ध काँग्रेस’ आणि 2005 नंतर ‘राणे विरुद्ध ठाकरे’ असा राजकीय संघर्ष सिंधुदुर्गात पाहायला मिळाला. राणे आज भाजपचे खासदार आहेत. पण नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये राणे प्रथमच निवडणूक प्रचारापासून दूर राहिले. गेल्या 35 वर्षांत हे पहिल्यांदाच घडले असावे. ‘राणे विरुद्ध ठाकरे’ या संघर्षालाही त्यामुळे काहीसा अल्पविराम मिळाला. मात्र, ‘संघर्ष आणि राणे’ समीकरण कायम राहिले. राणेंचे थोरले चिरंजीव ‘शिवसेना आमदार नीलेश राणे विरुद्ध भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण’ असा नवा सत्तासंघर्ष बघायला मिळाला.
नगरपरिषद निवडणूक मतदान प्रक्रिया 2 डिसेंबर रोजी पार पडली. निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्या अगोदर 8 डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रवींद्र चव्हाण आणि नीलेश राणे यांनी विधीमंडळ आवारात एकमेकांची भेट घेतली. हसतमुखाने हस्तांदोलन करत ‘निवडणूक संपली, वाद मिटला’चा संदेश महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्याचा प्रयत्न केला. पण हे चित्र पाहून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काय वाटले असेल हे त्यांनाच ठाऊक. निवडणुकीचा निकाल, जर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी लागला असता, तर मालवणात काय परिस्थिती असती, महायुतीतील या दोन प्रमुख नेत्यांचे इतक्या सहजासहजी मनोमिलन झाले असते, की संघर्षाची धार अजून कायम राहिली असती, असे अनेक प्रश्न आज महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मनात घोळत असतील. कारण निवडणूक प्रचारादरम्यान स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमधील संबंध प्रचंड ताणले गेले होते.
रत्नागिरीत महायुती होत असताना सिंधुदुर्गात मात्र भाजपकडून शिवसेना आणि आपल्याला कुठेतरी कमी लेखले जातेय, असा थेट आरोप आमदार नीलेश राणे यांनी सातत्याने केला. त्यांचा रोख भाजप पक्षावर नव्हता, तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर होता. यातूनच सिंधुदुर्गात भाजप विरुद्ध शिवसेना जोरदार संघर्ष सुरु झाला. रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. फडणवीस यांचा वरदहस्त असलेल्या भाजपमधील या पॉवरफुल्ल नेत्याला अंगावर घेऊन नीलेश राणे यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. नगर परिषद निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांनी सर्वप्रथम मालवणात भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांकडून जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर केले गेले असल्याचा आरोप केला. त्यासंबंधीची कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर केली. त्यानंतर ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले ते ‘पैसे वाटप स्टिंग ऑपरेशन्स’मुळे. भाजपच्या मागे हात धुऊन मागे लागल्याप्रमाणे त्यांचा वावर सुरू झाल्याने प्रसारमाध्यमांसाठी ते ‘न्यूजमेकर’ बनले. कारण भाजप प्रदेशाध्यक्षांनी विशेष लक्ष दिलेल्या निवडणुकांमध्ये अशी झुंज देणे ही सोपी गोष्ट नव्हती. शत-प्रतिशत भाजपचा नारा देणाऱ्या रवींद्र चव्हाण यांच्याशी पंगा घेऊन नीलेश यांनी खूप मोठी जोखीम पत्करलीय. त्यांना ही लढाई झेपणार आहे का, असा सवालही उपस्थित झाला. पण वडील नारायण राणे हे भाजपचे खासदार आणि धाकटे बंधू नीतेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री असूनही त्यांनी ही जोखीम पत्करली आणि शेवटपर्यंत मागे हटले नाहीत. रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच सिंधुदुर्गात महायुतीतील वातावरण बिघडून आजची संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राणेंच्या राजकीय अस्तित्वाला कुठेतरी आव्हान देण्याचे षडयंत्र रचले गेलेय. पण आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही. भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये आज राणेंनी घडविलेली आणि राणेंना मानणारी माणसे आहेत, असा खूप आक्रमक आणि तितकाच भावनिक पवित्रा घेऊन नीलेश राणे पुढे गेले. परंतु त्यांच्या भूमिकेतील भावनिक किनार बाजूला पडून रवींद्र चव्हाणविरोधी पर्यायाने भाजपविरोधी भूमिकाच विशेष चर्चेत राहिली. ‘आग मालवणात अन् धग महाराष्ट्रात’ अशा शब्दांत त्यांच्या या राजकीय संघर्षाचे वर्णन केले गेले.
भाजपमुळे नीलेश राणे आमदार झाले. त्यांची स्वत:ची अशी राजकीय ताकद नाही. त्यामुळे त्यांना किंमत द्यायची गरज नाही, अशी भूमिका रवींद्र चव्हाण यांनी घेतल्यामुळेच आम्हाला आमची ताकद दाखविण्यासाठी रिंगणात उतरावे लागले. नारायण राणे यांचे आम्हाला आशीर्वाद आहेत, असे मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत नीलेश राणे बोलत होते. रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्गातही महायुतीसाठी नारायण राणे आग्रही होते. रत्नागिरीतील सात नगरपरिषदांमध्ये केवळ 20 जागांवर भाजपने समाधान मानले. सिंधुदुर्गात तर आम्ही ‘फिफ्टी-फिफ्टी’चा फॉर्म्युला अवलंबत होतो. तरीपण महायुतीचा प्रस्ताव सिंधुदुर्गात धुडकावला गेला. राणेंवर एवढा राग का, असा धागा पकडत नीलेश राणे प्रचारात सक्रीय राहिले. पण राजकीय पटलावर चर्चेत येण्यासाठी उपयुक्त ठरणारे मुद्दे उपस्थित करण्याबरोबरच निवडणुकांमधील निकालही त्याहीपेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतात. म्हणूनच नीलेश राणे यांनी ज्या सिंधुदुर्गात भाजपविरोधात जोरदार लढा दिलाय, तेथील मतदारांनी काय कौल दिलाय, हे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरणार आहे. कारण निवडणुका म्हटल्यावर विजय महत्त्वाचा असतो. विजयासारखे दुसरे टॉनिक नाही. निवडणुकीतील यश-अपयशावरून तुमचे मोजमाप केले जाते. त्यामुळे नीलेश राणेंना किमान मालवणात तरी विजय संपादन करावा लागेल. अन्यथा पराभव झाल्यानंतर पुढचा काळ कसा कठीण जातो हे नीलेश राणे स्वत:च या निवडणुकीत कथन करत आले आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कोकणात मोठा पराभव झाला. त्यावेळी एकजुटीने महायुती महाविकास आघाडीविरोधात लढली होती. पण नगरपरिषद निवडणुकांमध्ये सिंधुदुर्गात महायुती तुटल्यामुळे त्याचा फायदा ठाकरे शिवसेनेला होऊ शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जातोय. महायुतीतील दोन्ही मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्यामुळे मत विभाजनाचा फटका त्यांच्या उमेदवारांना बसू शकतो. अशा परिस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभेत मिळालेली मते स्थिर राहिली आणि अधिकची मते ठाकरेंच्या शिलेदारांनी वैयक्तिक प्रभावावर खेचून आणली, तर ठाकरेंची सेना बाजी मारू शकेल, असा तर्क त्यामागे आहे.
नगर परिषद निवडणुकीत नारायण राणे कुठेच थेट प्रचारात उतरलेले नाहीत. कारण महायुती तुटली होती. एक मुलगा भाजपमध्ये आणि दुसरा शिवसेनेत अशी अवघड परिस्थिती होती. मात्र, या परिस्थितीतही राणेंनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. कणकवलीत जेथे त्यांचे धाकटे चिरंजीव नीतेश राणे आमदार आहेत, तेथील भाजपच्या उमेदवारांना राणेंनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भेट देत भाजप उमेदवारांनाच आपले आशीर्वाद असल्याचे जाहीर केले. पण मालवणात ते भाजप उमेदवारांपासून अलिप्त राहिले. मालवणात शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ममता वराडकर यांनी त्यांची नीलरत्न बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारसभेसाठी मालवणात आले असता, त्यांनी नारायण राणे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावरून राणेंनी कणकवली व मालवणातील आपल्या समर्थकांना आपल्या परीने योग्य तो मेसेज दिला. मग तो तांत्रिकदृष्ट्या भाजपमध्ये कार्यरत असो वा नीलेश राणेंसोबत शिंदे शिवसेनेत असो. पण ज्येष्ठ राणेंनी कुणाच्याच बाजूने असे थेट मैदानात न उतरणे भाजप आणि शिवसेनेला विशेष करून त्यांच्या दोन्ही पुत्रांना राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे का, हे स्पष्ट करणारी ही निवडणूक आहे. त्याचप्रमाणे दोघांच्या भांडणात तिसरा उमेदवार निवडून आल्यास सत्तेतील या दोन्ही पक्षांकडून कोणत्या हालचाली केल्या जातील, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवाय, नीलेश राणे यांनी म्हटल्याप्रमाणे सिंधुदुर्गात राणेंच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लावणे हेच रवींद्र चव्हाण यांचे प्रमुख लक्ष्य असेल, तर निवडून आलेल्या तिसऱ्या पक्षाच्या विजयी उमेदवाराला गळाला लावण्यासाठी भाजपकडून विशेष लक्ष केंद्रीत केले जाईल का, याची चर्चाही यानिमित्तानं राजकीय पटलावर रंगली आहे.
महेंद्र पराडकर