तुम्ही आमचे राजे नाहीत!
ऑस्ट्रेलियाच्या संसदेत किंग चार्ल्स यांच्यावर भडकली खासदार
वृत्तसंस्था/ कॅनबेरा
ऑस्ट्रेलियाच्या संसदेला संबोधित करण्यासाठी पोहोचलेले ब्रिटनचे राजे चार्ल्स यांना विरोधाला तोंड द्यावे लागले आहे. ऑस्ट्रेलियातील खासदार लिडिया थॉर्प यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. हा तुमचा देश नाही. ही आमची भूमी असुन तुम्ही येथून निघून जावे असे लिडिया यांनी चार्ल्स यांना उद्देशून म्हटले आहे.
मार्शल्सच्या मदतीने थॉर्प यांना रोखण्यात आले आणि मगच 75 वर्षीय चार्ल्स यांनी स्वत:चे संबोधन सुरू केले. स्वातंत्र्याच्या 123 वर्षांनंतरही ऑस्ट्रेलिया अद्याप प्रजासत्ताक ठरला नाही. चार्ल्स हे आमचे राजे नाहीत. ही आमची भूमी असल्याचे लिडिया यांनी म्हटल्याने चार्ल्स यांना स्वत:चे भाषण रोखावे लागले. ऑस्ट्रेलिया सुमारे एक शतकापर्यंत ब्रिटनची वसाहत होता. 1901 मध्ये ऑस्ट्रेलियात स्वतंत्र सरकार स्थापन झाले. परंतु ब्रिटनच्या राजघराण्यासोबत झालेल्या करारानुसार तेथील राजे चार्ल्स हेच आहेत.
राजे चार्ल्स हे 9 दिवसांच्या अधिकृत ऑस्ट्रेलियात दौऱ्यावर आहेत. मागील कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. तर लिडिया थॉर्प यांन 2022 मध्ये शपथविधीनंतर महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा विरोध केला होता. त्यावेळी एलिझाबेथ या ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रप्रमुख होत्या. त्यांनी महाराणी एलिझाबेथ यांच्या नावाने शपथ घेण्यास नकार दिला होता.
राजे चार्ल्स याच्या स्वागत सोहळ्यात सर्व 6 ऑस्ट्रेलियन राज्यांच्या प्रमुखांनी भाग घेतला नाही. ब्रिटिश सम्राटऐवजी एक ऑस्ट्रेलियन नागरिकाला राष्ट्रप्रमुख म्हणून पाहणे पसंत करू असे सांगत या नेत्यांनी निमंत्रण नाकारले होते. वर्तमान पंतप्रधान अल्बानीज हे ऑस्ट्रेलिया एक प्रजासत्ताक ठरावे अशी इच्छा बाळगून आहेत. परंतु स्वत:च्या वर्तमान कार्यकाळादरम्यान यासंबंधी जनमत चाचणी करविण्यास त्यांनी नकार दिला आहे.