तुका म्हणे तोचि संत
आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करावयाची असल्यास संतसंग अतिशय महत्त्वाचा भाग आहे. परंतु या भौतिक जगामध्ये संत म्हणजे भगवंताचा भक्त होणे कठीण आहे. याचे कारण म्हणजे सर्वसाधारण लोक प्रवृत्ती मार्ग म्हणजे तथाकथित भौतिक सुख प्राप्त करण्याचा मार्ग स्वीकारतात परंतु प्रामाणिक संत निवृत्ती मार्ग म्हणजे जगातील सर्व भौतिक सुखापासून मुक्त होऊन इंद्रियांच्या अधीन न जाता त्यांना भगवंताच्या सेवेत समर्पित करण्याचा मार्ग स्वीकारतात. म्हणून प्रामाणिक संतांना सामान्य लोकांचा विरोध सहन करावा लागतो, परंतु त्याला आध्यात्मिक मार्गाचे महत्त्व माहीत असल्याने तो आपल्या भगवद्भक्तीच्या मार्गामध्ये निश्चल आणि दृढ राहतो. अशा संतांच्याविषयी वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ।।1।। तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ।।ध्रु.।।मोहरा तोचि अंगें । सूत न जळे ज्याचे संगें ।।2।। तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ।।3।। अर्थात ‘खरा हीरा ऐरणीवर ठेवून वरून हातोडा मारला तरी फुटत नाही. त्याच हिऱ्याला खरे मूल्य असते, चुरा होतो तो कृत्रिम हिरा होय. ज्याच्या संगतीत सूत जळत नाही, तोच खरा मोहरा होय. संत ही तसेच असतात जे हरिभक्तीचा प्रचार करण्यासाठी जगाचे आघात सहन करत असतात.
संत हे आपल्या उदाहरणावरून सामान्य लोकांना हरिभक्ती कशी करावी हे शिकवितात. अर्भकाचे साठी । पंते हातीं धरिली पाटी ।।1।।तैसे संत जगीं। क्रिया कऊनी दाविती अंगीं ।।ध्रु.।। बालकाचे चाली। माता जाणुनि पाउल घाली ।।2।।तुका म्हणे नाव । जनासाठी उदकीं ठाव ।।3।। अर्थात ‘लहान मुलांना शिकवण्यासाठी पंतोजी (शिक्षक) आपल्या हातात पाटी धरत असतात. त्याप्रमाणे संतदेखील आहेत. ते मुक्त आहेत परंतु सामान्य लोक मुक्त व्हावे याकरता जगामध्ये वावरतात आणि चांगले कर्म अर्थात हरिभक्ती करून जगाला मार्गदर्शन करतात. लहान बालकाचे हळूहळू पावले टाकणे पाहून त्याच्या चालीनुसारच आई पाऊल टाकते. तुकाराम महाराज म्हणतात, लोकांना पाण्यातून तरून जाण्याकरताच नाव पाण्यामध्ये रहात असते. त्याचप्रमाणे संत या जगात राहून सामान्य लोकांचा उद्धार करतात म्हणजे हरिभक्तीचा मार्ग दाखवतात. यासाठी तुकाराम महाराज सांगतात की जो शरीर भावनेतून मुक्त नाही आणि हरिभक्तीमध्ये संलग्न झाला नाही तो संत असू शकत नाही. म्हणून बाह्य कारणांनी संत पाहू नयेत. नव्हती ते संत करितां कवित्व । संतांचे ते आप्त नव्हती संत ।।1।।येथें नाहीं वेश सरत आडनांवें । निवडे घावडाव व्हावा अंगीं ।।ध्रु.।।नव्हती ते संत धरितां भोंपळा । करितां वाकळा प्रवार्णाशी ।।2।।नव्हती ते संत करितां कीर्तन । सांगतां पुराणें नव्हती संत ।।3।।नव्हती ते संत वेदाच्या पठणें । कर्म आचरणें नव्हती संत ।।4।। नव्हती संत करितां तप तीर्थाटणें । सेविलिया वन नव्हती संत ।।5।।नव्हती संत माळामुद्रांच्या भूषणें। भस्म उधळणें नव्हती संत ।।6।।तुका म्हणे नाहीं निरसला देहे । तों अवघे हे सांसारिक ।।7।।अर्थात ‘कवित्व केले म्हणजे संत होत नाही किंवा संतांचे आप्तेष्ट नातेवाईक आहेत म्हणून नातेवाईक संत होत नाही. केवळ संतासारखा वेश आहे म्हणून किंवा संतांचे आडनाव आहे म्हणून संत होत नाही तर जगाचे विविध प्रकारचे घाव सहन करून संतपद प्राप्त होते. हातात भोपळा घेतला आणि वाकळाचे प्रावरण म्हणजे कांबळे पांघरूण घेतले म्हणजे संत होत नाही. कीर्तन केले म्हणजे संत होत नाही. पुराणे, कथा सांगितली म्हणजे संत होत नाही. वेदांचे पठण केले किंवा कर्माचरण केले म्हणून कोणी संत होत नाही. तीर्थाटन केल्याने किंवा तप अनुष्ठान केल्याने किंवा वनात जाऊन राहिल्याने कोणी संत होत नाही. माळ मुद्रांचे पोषण केले आणि भस्म उधळले तरी कोणी संत होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत ज्याच्या ठिकाणी देह भावना आहेत तोपर्यंत ते सर्व संसारिकच आहेत असे समजावे.
आणखी एका अभंगात ते सांगतात, घालूनियां मध्यावर्ती । दाटुनि उपदेश देती ।।1।।ऐसे पोटभरे संत । तयां कैंचा भगवंत ।।ध्रु.।।-- पोरांतें गोविती। वर्षासने ते लाविती ।।2।। जसे बोलती निरोपणीं। तैसी न करिती करणी ।।3।।तुका म्हणे तया । तमोगुणियांची क्रिया ।।अर्थात ‘शिष्य करण्यासाठी काही लोक मध्यस्थी कोणाला तरी घेतात आणि बळेच लोकांना उपदेश करतात. असे हे पोट भरणारे संत आहेत मग त्यांना भगवंत तरी कसा प्राप्त होईल? असे हे निर्लज्ज लोक भोळ्या भाबड्या बायका मुलांना आपल्या वचनामध्ये गुंतवून टाकतात आणि प्रतिवषी दान त्यांच्याकडून घेतात. कीर्तनामध्ये जसे हे लोक बोलतात त्याप्रमाणे वागत तर नाहीतच. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांच्या प्रत्येक क्रिया म्हणजे तमोगुणानेच भरलेल्या आहेत.
त्याचप्रमाणे, गुळें माखोनियां दगड ठेविला । वर दिसे भला लोकाचारी ।।1।।अंतरिं विषयाचें लागलें पैं पिसें । बाहिरल्या वेषें भुलवी लोकां ।।ध्रु.।। ऐसिया दांभिकां कैची हरीसेवा । नेणेचि सद्भावा कोणे काळी।।2।।तुका म्हणे येणें कैसा होय संत। विटाळलें चित्त कामक्रोधें ।।3।।अर्थात ‘एखाद्या दगडाला वरवर गूळ माखून ठेवला व गुळाची ढेप म्हणून चार लोकामध्ये ठेवले तर ती चांगली ढेप आहे असे लोकांना वाटते. त्याप्रमाणे काही मनुष्य असे आहेत की, त्यांच्या अंत:करणामध्ये विषयाचे वेड लागलेले आहे परंतु बाहेरून संतांचा वेष धारण करून लोकांना ते फसवत असतात. अशा दांभिकांना मग कशी हरीची सेवा घडेल, सद्भावना म्हणजे काय हे त्यांना माहीतच नसते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे चित्त काम, क्रोधाने विटाळलेले आहे तो संत होईलच कसा? यासाठी आध्यात्मिक मार्गामध्ये प्रामाणिकपणे ज्यांना प्रगती करावयाची आहे म्हणजे हरिभक्ती करून मनुष्यजन्माचे सार्थक करावयाचे आहे अशा भाग्यवान हरिभक्ताना प्रामाणिक संत कोण आहे हे सांगताना महाराज उपदेश करतात, जन्मा येऊनि तया लाभ जाला । बिडवई भेटला पांडुरंगा ।।1।। संसारदु:खें नासिलीं तेणें । उत्तम हें केणें नामघोष ।।ध्रु।। धन्य तेचि संत सिद्ध महानुभाव । पंढरीचा ठाव ठाकियेला।।2।।प्रेमदाते तेच पतितपावन। धन्य दऊषन होय त्याला।।3।।पावटणि पंथें जालिया सिद्धी। वोगळे समाधि सायुज्यता।।4।।प्रेम अराणूक नाहीं भय धाक । मज तेणें सुखें कांहीं चिंता।।5।।तें दुर्लभ संसारासी। जडजीव उद्धारलोकासी।।6।।तुका म्हणे त्यासी । धन्य भाग्य दरूषणें ।।7।। अर्थात ‘जन्माला येऊन त्यांनाच लाभ झाला ज्यांना भवसागरातून तारणारा पांडुरंग भेटला. संसारदु:खाचा त्यांनी नाश केला ज्यांच्याजवळ हरीच्या नामघोषाचा उत्तम मार्ग आहे. ज्यांनी पंढरीच्या ठिकाणी आपला निवास केला आहे ते संत सिद्ध महानुभाव धन्य आहेत. ते जगामध्ये प्रेमाचे दान वाटत असतात आणि पतितांना पावनदेखील करतात. त्यांचे दर्शन ज्याला होईल त्यालाही धन्य म्हणावे. संत ज्या मार्गाने चालतात त्या मार्गातील पायऱ्या अष्टमहासिद्धी होतात आणि समाधी व मोक्ष हे तर त्यांची सेवाच करतात. ते साधू संत स्वत:शीच म्हणतात की मला हरीचेच सुख आहे. त्यामुळे कशाची चिंता नाही आणि त्यांना हरीचे प्रेम मिळाले त्यामुळे त्यांना कशाचे भय किंवा चिंता नसते. असे हे सिद्ध संत महानुभाव संसारी लोकांना भेटणे दुर्लभच आहेत, जे नेहमी जड जीवांचा उद्धार करत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या कोणाला अशा सिद्ध संत महानुभावाचे दर्शन झाले त्यांचे भाग्य धन्य आहे.’ अशा संतांची संगत प्राप्त करण्यासाठी मनुष्य जन्मात प्रयत्न करावा.
-वृंदावनदास