संमेलनाची लगबग...
राजधानी नवी दिल्लीत होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आत्तापासूनच लगबग सुरू झाली आहे. नवीन वर्षाच्या सुऊवातीला म्हणजेच 21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान हा साहित्य सोहळा रंगणार असून त्याकडे समस्त मराठी भाषकांचे लक्ष असेल. मराठी साहित्य विश्वात मराठी साहित्य संमेलनाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. पहिले मराठी साहित्य संमेलन 1878 मध्ये पुण्यातील हिराबागेत पार पडले. तेव्हा या साहित्य सोहळ्याचा उल्लेख ग्रंथकार संमेलन असा केला जात असे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे या संमेलनाचे पहिले अध्यक्ष होते. सुऊवातीला काही वर्षांच्या अंतरात संमेलन व्हायचे. नंतर नियमितपणे संमेलन हेऊ लागले. आता दरवर्षी संमेलनाचा हा उत्सव रंगताना दिसतो. यंदाचे साहित्य संमेलन तर अनेकार्थांनी वैशिष्ट्यापूर्ण असेल. मुख्य म्हणजे दिल्लीमध्ये तब्बल 70 वर्षांनंतर हे संमेलन होत आहे. त्या वेळी संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी महाराष्ट्रातील वजनदार नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काकासाहेब गाडगीळ यांच्याकडे होती. याशिवाय तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे संमेलनाचे अध्यक्ष होते. तर पंतप्रधान पंडित नेहरू यांनी या संमेलनाचे उद्घाटन केले होते. आता पुन्हा असाच त्रिवेणीसंगम दिल्लीत घडण्याचा योग जुळून आला आहे. सरहद संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. तारा भवाळकर यांच्याकडे असेल. महत्त्वाचे म्हणजे या संमेलनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या करिता मोदी यांनी अनुकूलता दर्शविल्याचेही समजते. तथापि, साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा तालकटोरा स्टेडियमऐवजी विज्ञान भवनात हेऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जाते. पवार आणि मोदी हे परस्परांचे राजकीय विरोधक मानले जातात. मात्र, त्यांच्यातील मैत्र या दोघांनीही कधी लपवलेले नाही. मोदी यांनी अनेकदा पवारांच्या कार्यक्रमांना हजेरी लावल्याची उदाहरणे आहेत. पवार हे आपले गुरू असल्याचे मोदींनी काही वर्षांपूर्वी केलेले विधान अजूनही अनेकांच्या स्मरणात असेल. तर मोदींच्या कामाचे पवार यांनी केलेले कौतुकही जगजाहीर आहे. या पार्श्वभूमीवर साहित्य हा विषय मध्यवर्ती ठेऊन या दोघांची झालेली भेट आश्चर्याचा विषय ठरू नये. या भेटीतून शरद पवार अणि मोदींचा भाजपा जवळ येत असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात निर्माण झाल्या. मात्र, केवळ त्याच चष्म्यातून याकडे पाहणे चुकीचे ठरते. शरद पवार हे राजकारणाशिवाय अनेक विषयात रस घेणारे नेते म्हणून देशाला परिचित आहेत. कला, क्रीडा, कृषी, तंत्रज्ञान यांसह वेगवेगळ्या विषयातील त्यांची ऊची आपण नेहमी पाहत आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताराही याबाबतीत पवारांशी जुळतात. मोदी यांच्याकडे रसिकता आहे. संतसाहित्याचा त्यांचा अभ्यास आहे. शिवाय वेगवेगळ्या भाषातील साहित्यसंपदा समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न कायम दिसत असतो. हे पाहता मोदी यांच्या हस्ते दिल्ली संमेलनाचे उद्घाटन होणे समयेचितच ठरेल. मागच्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी होत होती. त्याकरिता मराठीजनांकडून मोठ्या प्रमाणात पाठपुरावाही सुरू होता. अखेर मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाला, हे मान्य केले पाहिजे. साहित्य संमेलनाच्या सोहळ्यात याचे श्रेय घेण्याची संधी मोदी नक्कीच सोडणार नाहीत. साहित्यामध्ये विचारांना, विचारांच्या आदानप्रदानाला अतिशय महत्त्व असते. त्याकरिता संवाद आवश्यक होय. हे पाहता वेगवेगळ्या पक्षातील मंडळी संमेलनाच्या माध्यमातून एकत्र येत असतील, तर ते चांगले लक्षण म्हणता येईल. या संमेलनास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय साहित्य संमेलनास देशभरातून पाच हजार, तर महाराष्ट्रातून अडीच हजार साहित्यप्रेमी हजेरी लावण्याची चिन्हे आहेत. हे बघता संमेलन जोरदार होणार, हे निश्चितच होय. सरहद संस्थेला संमेलनाचा अनुभव आहे. संस्थेचे प्रमुख संजय नहार यांच्या पुढाकारातून मध्यंतरी संत नामदेव यांची भूमी असलेल्या पंजाबमधील घुमानमध्येही संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या यशस्वितेबाबत शंका व्यक्त करण्यात येत होत्या. प्रत्यक्षात हे संमेलन यशस्वीरीत्या पार पडले. हे बघता दिल्लीच्या संमेलनाबाबत साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता राहील. संमेलनास्थळाला छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे. तर मुख्य सभागृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. दोन प्रवेशद्वारांना अनुक्रमे लोकमान्य टिळक आणि यशवंतराव चव्हाण यांची नावे असतील. याशिवाय संमेलनात विविध ज्वलंत विषयांवरील परिसंवाद, कविसंमेलन तसेच अन्य विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल. त्या अर्थी हे संमेलन संस्मरणीय ठरू शकते. मागच्या काही वर्षांत मराठी भाषेपुढची आव्हाने वाढली आहेत. पालकांचा कल मुलांना इंग्रजी शाळांमधून शिक्षण देण्याकडे दिसून येतो. त्यामुळे मराठी शाळा ओस पडताना दिसतात. जवळपास सर्वच राज्यांमध्ये हीच स्थिती दिसते. ती कायम राहिली, तर सर्वच प्रादेशिक भाषा अडचणीत येऊ शकतात. हे पाहता संमेलनात प्रादेशिक भाषा टिकविण्यासाठी व्यापक चर्चा होणे आवश्यक ठरते.