योगी यज्ञ करून ब्रह्मप्राप्ती करून घेतात
अध्याय तिसरा
बाप्पा म्हणाले, काही योगी प्राणायामच्या माध्यमातून नैसर्गिकरीत्या चालू असलेल्या आपल्या श्वसन क्रियेवर ताबा मिळवतात. प्राणायामचा अभ्यास आवश्यक तेव्हढा झाला म्हणजे मनाचे चांचल्य मोडून मन एकाग्र होण्यास मदत होते. योगाभ्यासास अनुकूल अशी श्वास घेण्याची व सोडण्याची गती त्याच्या सवयीची होते. त्याची चित्तवृत्ती स्थिर होऊन तो निर्विकल्प समाधीचा अनुभव सतत घेऊ शकतो. प्राणायाममुळे चित्तातील सत्वगुणावर रज आणि तम गुणाचे असलेले पांघरूण काढले जाते. त्यामुळे रज, तम गुणांमुळे होणाऱ्या वासना निर्बल होतात. साधकाची विषयांची ओढ कमी होते.
पुढील श्लोकात बाप्पा सांगतायत की, योगी प्राणाच्या मूळ गतीचे हवन करून योगाभ्यासाला अनुकूल अशी प्राणांची गती प्राप्त करून घेतात असे अनेक यज्ञ करून ते ब्रह्मप्राप्ती करून घेतात.
जित्वा प्राणान्प्राणगतीरुपजुह्वति तेषु च । एवं नानायज्ञरता यज्ञध्वंसितपातका ।।36 ।।
नित्यं ब्रह्म प्रयान्त्येते यज्ञशिष्टामृताशिन । अयज्ञकारिणो लोको नायमन्य कुतो भवेत् ।।37।।
अर्थ- योगी प्राणांना जिंकून त्यांचे ठिकाणी प्राणाच्या गतींचे हवन करतात. नानाप्रकारच्या यज्ञांचे ठिकाणी रत असलेले व यज्ञाने पातकांचा नाश झालेले असे हे यज्ञाचे अवशिष्ठ जे अमृतरूपी फल ते भोगणारे होऊन ब्रह्माप्रत जातात. यज्ञ न करणाऱ्याला हा मनुष्य लोक देखील प्राप्त होत नाही, मग परलोक कोठून प्राप्त होणार?
विवरण- योगी करत असलेल्या निरनिराळ्या यज्ञांची माहिती आपण घेतली. यज्ञ म्हणजे कर्तव्य करणे. ते करत असताना स्वत: निरपेक्ष होणे हा मुख्य उद्देश असतो. ह्या यज्ञांच्या माध्यमातून ते त्यांच्या शरीराच्या अवस्थेला योगाभ्यासाला अनुकूल करून घेतात. त्यासाठी ते आपल्याजवळ जे काही आहे त्यातून गरजूला दान करतात, समाजाच्या उपयोगी पडणारी कामे करतात, आपल्या प्राणांची गती बदलतात, ह्या सगळ्यामुळे त्यांच्या स्वभावात सत्वगुणाची वाढ होते आणि त्याप्रमाणात स्वभावातील रज, तम गुण कमी होतात. रज, तम गुणामुळे योभ्यासाला प्रतिकूल असणाऱ्या वासना होत असतात परंतु सत्वगुण वाढल्यामुळे त्या आपोआपच कमी होतात. ह्या सगळ्या यज्ञांचे फळ म्हणून योगी ब्रह्मप्राप्तीसाठी लायक होत जातो. मनुष्य जन्माला आल्यावर ब्रह्मप्राप्ती होण्यासाठी प्रयत्न करणे आणि ती प्राप्त करून घेणे हे मुख्य उद्दिष्ट असायला हवे. ते लगेच जरी साध्य झाले नाही तरी त्यासाठी प्रयत्न करणाऱ्याचे आयुष्य सार्थकी लागते. जे ह्या दृष्टीने प्रयत्न करत नाहीत त्यांचा जन्म वाया जातो. मग पुढील जन्म त्यांनी ह्याजन्मी जी काही भली वाईट कार्ये केली असतील त्यानुसार मिळतो. अर्थातच तो माणसाचा असेल असे सांगता येत नाही. म्हणून बाप्पा सांगतायत की, माणसाने जन्माला आल्यावर निरपेक्षतेने कार्ये करावीत, शक्य असेल तेव्हढा दानधर्म करावा, लोकांच्या उपयोगी पडावे, साधना करून स्वभावात सत्वगुणाची वाढ करायचा प्रयत्न करावा. असे जो करेल त्याचा जन्म सार्थकी लागेल. जे असे करणार नाहीत त्यांना पुन्हा मनुष्यजन्म मिळणार नाही मग त्यांना परलोकातील पुढील गती प्राप्त होण्याची चर्चाच करायला नको कारण ते शक्यच नसते. हे ज्यांना माहित नसते ते चुकीचे वागले तर ते क्षम्य ठरते परंतु माहित असूनसुद्धा काही लोक ह्याकडे दुर्लक्ष करतात कारण त्यांच्यातील रज, तम गुणांच्या प्राबल्यामुळे ते त्यांच्या इच्छा आणि त्या पुऱ्या न झाल्याने येणाऱ्या रागाची शिकार होतात. म्हणून माणसाने सदैव सावध राहून आपली वर्तणूक वारंवार तपासत राहून त्यात आवश्यक ते बदल करण्याचा प्रयत्न करावा
क्रमश: