For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

योगामृतशास्त्र

06:29 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
योगामृतशास्त्र
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

बाप्पा म्हणाले, आत्तापर्यंत आपण संप्रज्ञात समाधीचे सवितर्क, सविचार, सानंद आणि सास्मित असे चार प्रकार बघितले. ही परिस्थिती आपण एका उदाहरणाने समजावून घेवू. समजा एखाद्या विद्यार्थ्याने महत प्रयासाने इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवलेला आहे. त्याचा कोर्स सुरु होऊन तो एक एक टप्पा पार करत पुढं चाललेला आहे. त्या कालावधीत मी पास झाल्यावर असं करीन, तसं करीन असे विचार त्याच्या मनात सतत चालू असतात आणि त्या विचारात गढून जाऊन तो खुश होतो. याला सवीतर्क म्हणता येईल. पुढे पुढे आगामी कृतीविषयी मनात कोणतेही विचार न येताही आपण लवकरच इंजिनिअर होणार आहोत या नुसत्या कल्पनेनं तो खुश होत असतो. याला सविचार म्हणूयात. जसजसा कोर्स पूर्ण होत येईल तसतसा कोणत्याही विचारांशिवाय तो कायम खुश असतो. याला सानंद म्हणता येईल. त्याहीपुढे जाऊन जेव्हा तो प्रत्यक्ष पास होऊन नोकरीला लागून स्थिर होतो तेव्हा आता आपला भविष्यकाळ उज्वल आहे याच्या सततच्या जाणिवेने तो कोणत्याही कारणाशिवाय खुश असतो. त्याचं हे खुश असणं कशावर अवलंबून नसल्याने कायम टिकून असतं. याला सास्मित म्हणता येईल.

संप्रज्ञात समाधीपर्यंत साधकाची प्रगती साधून देणारे, सवीतर्क, सविचार, सानंद व सास्मित असे एकापेक्षा एक वरचढ असे चार टप्पे आपण बघितले. सास्मित समाधीत अस्मि म्हणजे मी आहे इतकाच भाग राहिलेला असतो. तोही नष्ट झाला की, असंप्रज्ञात समाधी साधली जाते. अशा रीतीने पायरीपायरीने सलग अभ्यास करत गेलेला साधक लोकांच्याकडून कोणतीही अपेक्षा न बाळगता केवळ प्रारब्धानुसार वागत असतो. त्याने आहार व वासनाजय साधलेला असतो.

Advertisement

आत्तापर्यंत बघितलेल्या समाधींच्या अभ्यासाने आत्मिक बळ वाढते आणि ह्या आत्मिक बळाच्या सहाय्याने सद्गुरूंचा उपदेश प्रभावीपणे अमलात आणता येतो. सद्गुरु सांगत असतात की, साधकाने आशा, अपेक्षांचा त्याग केला पाहिजे, सर्वांच्याकडे ते ईश्वरी अंश आहेत हे लक्षात घेऊन सम दृष्टीने पाहिले पाहिजे. हे सर्व वाचले की, पटते पण व्यवहारात वागताना सहजी अमलात आणायला साधकाचे मन तयार होत नाही. काहीवेळा वागताना चुकल्यावर, लक्षात येते की, आपण वाचलेले विसरलो व चुकीचे वागलो. आता पुढे अशी चूक करूया नको. पण पुन्हा काही तरी विपरीत प्रसंग घडतो आणि आपण पुन्हा तीच चूक करतो. असं वारंवार होऊ नये व वाचल्याबरहुकूम वर्तन घडावे यासाठी आत्मिक बळाची गरज असते. हे आत्मिक बळ चित्त एकाग्र करण्याने मिळू शकते. म्हणून चित्त एकाग्र करण्यासाठी आत्तापर्यंत सांगितलेले समाधीचे प्रकार साधकाने जरूर अभ्यासावेत व त्यात प्राविण्य मिळवण्याचा प्रयत्न करावा म्हणजे योग साधला जातो.

सर्वसामान्य लोकांना योग म्हणजे व्यवहारातली चांगली संधी किंवा सोयीची गोष्ट असे वाटते आणि योग चांगला म्हणून मनासारखं घडलं, चला बरं झालं असं वारंवार बोलण्यात येतं पण वरेण्य राजाला योग म्हणजे काय हे समजावून सांगणाऱ्या बाप्पाना सर्वसामान्य लोक समजतात तसा योगाचा अर्थ अपेक्षित नाही. बाप्पाना असं म्हणायचं आहे की, योग म्हणजे तुमची ईश्वराशी नाळ जुळणे. हे साधण्यासाठी योगशास्त्र आहे. ज्याची नाळ परमेश्वराशी जुळलेली आहे तो आपोआपच असत्य किंवा भासमान असलेल्या जगापासून वेगळा होतो. म्हणजेच योगामुळे साधकाचा संबंध सत्याशी जोडला जाऊन तो असत्यापासून अलग होतो.  मोह हा माणसाला दुसऱ्याशी जोडतो. जो मोहापासून दूर जातो तो स्वत:तील ईश्वराशी जोडला जातो. मोह हा अहंकाराचा विस्तार आहे तर योग हा समर्पणाचा विस्तार होय. गणेशगीतेतल्या प्रत्येक अध्यायात मनुष्य मोहापासून तोडला जाऊन ईश्वराशी कसा जोडला जाईल या कल्पनेचा सविस्तर विचार केला आहे. म्हणून तिला योगामृतशास्त्र असे म्हंटले आहे. गीतेतही भगवंत अर्जुनाला तू ज्ञानी, तपस्वी, कर्मीष्ट होण्यापेक्षा योगी हो असा सल्ला देतात कारण पहिल्या तिघांना कसली ना कसली अपेक्षा असते.

ज्ञानी तापस कर्मिष्ठ ह्या सर्वांहूनि आगळा ।

मानिला तो असे योगी, योगी होई म्हणूनि तू ।। 6.46 ।।

क्रमश:

Advertisement
Tags :

.