For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

होय वारकरी, पाहे पंढरी

06:48 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
होय वारकरी  पाहे पंढरी
Advertisement

पंढरपूर हे हरिभक्तांचे माहेरघर आहे. जशी एखादी सासुरवाशीण माहेरी आपल्या आई-वडिलांच्या प्रेमळ छायेत येऊन सुखावते, तसेच हरिभक्त आपल्या श्री विठ्ठलाच्या चरणी येऊन सुखावतात. पांडुरंग आपल्या प्रेमाने आपल्या भक्तांना ओलेचिंब करतो. जसा माहेरी आलेल्या मुलीचा पाय माहेरातून निघत नाही, तशी हरिभक्तांना पंढरी सोडविशी वाटत नाही. त्यांचे सुख, समाधान, प्रेम त्यांचे मायबाप हे सर्व काही पंढरीतच आहे. पंढरपूर म्हणजे हरिभक्तांच्या भक्तीचा महापूर आहे. पंढरपूर शहर हे एक आगळेच नगर आहे. महाराष्ट्रातील ते एक श्रेष्ठ भक्तीनगर आहे. भाव आणि हरिभक्ती हेच काय ते येथले कार्य आणि हाच या नगराचा पंचप्राण आहे. दुधासारखे उत्तम पेय, मातृप्रेमासारखे खरेखुरे प्रेम, संत साधुसज्जनासारखा उत्तम सल्ला, मार्गदर्शन, उपदेश, परोपकारांसारखे दुसरे पुण्य आणि भक्तिसारखा परमेश्वर प्राप्तीचा सुगम उपाय या गोष्टींच्या तोडीच्या दुसऱ्या गोष्टी जगात सापडायच्या नाहीत. पंढरीत जे नाही ते इतर क्षेत्रात नाही व इतर क्षेत्री जे नाही ते या पंढरपूर क्षेत्री आहे, असे म्हटले जाते.

Advertisement

श्री पांडुरंगाच्या वास्तव्यामुळे पंढरपूर हे मूर्तिमंत आनंदस्थान म्हणून ओळखले जाते. येथे दु:खाचा लवलेशही नाही, म्हणून सर्व तीर्थांचा ‘मुकुटमणी’ म्हणून या क्षेत्राची महती आहे. श्री संत तुकाराम महाराजांनी अभंगातून या पंढरपूर क्षेत्राची माहिती वर्णली आहे. सकल तीर्थाहूनी । पंढरी हे मुकुटमणी।। काय सांगो तेथील शोभा । रमा वल्लभ जेथे उभा।। न लगे व्रत तीर्थ दानी । ते या विठ्ठल दर्शनी ।।  अर्थात ‘पंढरपूर क्षेत्र सर्व तीर्थांचा मुकुटमणी आहे. तेथील शोभा मी काय बरे वर्णन करू? तेथे स्वत: रमावल्लभ (विठ्ठल) उभे ठाकले आहेत. व्रत, तीर्थ आणि दान करून जे मिळत नाही ते केवळ विठ्ठलाच्या दर्शनाने विनाप्रयास येथे मिळते.’ असे हे भक्तिसुख प्राप्त करण्यासाठी वैष्णव पंढरपूरला आषाढी-कार्तिक वारीसाठी जातात.

होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ।।1।।काय करावीं साधनें । फळ अवघेचि येणें ।।ध्रु.।।अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ।।2।।तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ।।3।।अर्थात ‘वारकरी व्हा, वारकरी व्हा आणि प्रत्यक्ष डोळ्याने पंढरी पहा. बाकीची साधने काय करायची आहेत? सर्व काही फळ यानेच मिळते. असे केल्याने अभिमान नाहीसा होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. तुकाराम महाराज म्हणतात, डोळ्यांमध्ये सावळा विठ्ठल बसून राहतो. त्यामुळे सर्वत्र त्याचाच प्रत्यय येतो.’

Advertisement

अशी ही पंढरीची वारी अनेक पिढ्यापासून लाखो घरांमध्ये चालू आहे. पंढरीची वारी आहे माझे घरिं । आणीक न करिं तीर्थव्रत ।।1।।व्रत एकादशी करीन उपवासी । गाइन अहिर्निशी मुखीं नाम ।।2।।नाम विठोबाचें घेईन मी वाचे । बीज कल्पांतींचें तुका म्हणे ।।3।।अर्थात ‘कुलपरंपरेने पंढरीची वारी घरीच आहे या वाचून मी दुसरे कोणतेही तीर्थ आणि व्रत करीत नाही. मी एकादशी व्रत करून त्या दिवशी उपवास करीन आणि रात्रंदिवस हरिनाम घेत विठ्ठलाचे गुणगान गाईन. तुकाराम महाराज म्हणतात कल्पांतीचे बीज असलेले विठोबाचे नाम मी माझ्या मुखाने सतत गात राहीन.’

असे हे सर्व वारकरी पंढरपूरला कशासाठी जातात याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात चला पंढरीसी जाऊं। रखुमादेवीवरा पाहूं।।1।।डोळे निवतील कान । मना तेथें समाधान।।ध्रु।।संतां महंतां होतील भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ।।2।।तें तीर्थांचे माहेर । सर्वसुखाचें भांडार ।।3।।जन्म नाहीं रे आणीक । तुका म्हणे माझी भाक ।।4।।

अर्थात ‘हरिभक्तांनो, चला आपण पंढरीला जाऊ आणि ऊक्मिणीदेवीचा पती पांडुरंग याला पाहू. त्याच्या दर्शनाने डोळे आणि कथा श्र्रवणाने कान तृप्त होतील आणि तेथे मनालाही समाधान मिळेल. तेथे गेल्यानंतर आपल्याला संत महंत यांची भेट होईल व आनंदाने आपण वाळवंटात हरिकीर्तन करीत नाचू. पंढरपूर म्हणजे सर्व क्षेत्रांचे माहेर तसेच सर्व सुखाचे भांडार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ‘अरे जो कोणी तेथे जातो त्याला पुन: जन्ममरण नाही हे मी प्रतिज्ञेने सांगतो.’

यासाठी संसारचक्रातून बाहेर पडावयाचे असेल तर पंढरपूरला चला असे आवाहन करताना तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा। दीनाचा सोयरा पांडुरंग ।।1।।वाट पाहे उभा भेटीची आवडी। कृपाळूं तांतडी उतावीळ।।ध्रु.।। मागील परिहार पुढें नाही शीण । जालिया दर्षणें एकवेळा ।।2।।तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तो चित्तीं निवडेना ।।3।। अर्थात ‘हे संसारिक लोकांनो तुम्ही एकदा तरी पंढरीला नक्की जा कारण तेथे दीनांचा सोयरा पांडुरंग आहे. तो पांडुरंग भक्तांच्या भेटीकरता फार उतावीळ आहे आणि भक्तांची वाट तो सारखी पहात असतो. तो कृपाळू आहे आणि भेट घेण्याकरता तो तातडी करतो. त्या पांडुरंगाचे एकदा जरी मनापासून दर्शन झाले की मागील परिहार म्हणजे संचित आणि पुढे होणारे कष्ट भोगावे लागणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात की या पांडुरंगाकडे जे भक्त दर्शनासाठी येतात त्यांना तो दुसऱ्या कोणाच्याही हातात देत नाही आणि तो भक्तांच्या चित्तात एकदा का एकरूप झाला की काही केल्या वेगळा होत नाही. तो भक्तांच्या चित्तात निरंतर राहतो.”

पंढरपूरमध्ये जाऊन हरिभक्त काय करतात याबद्दल महाराज म्हणतात,  तेथें सुखाची वसति। गाती वैष्णव नाचती । दिंड्या पताका झळकती। जे गर्जती हरीनामें ।।1।।दोषा जाली घेघेमारी । पळती भरले दिशा चारी । न येती माघारिं । नाहीं उरी परताया ।।ध्रु.।। विसरोनि देवपणा । उभा पंढरीचा राणा । विटोनि निर्गुणा । रूप धरिलें गोजिरें।।2।।पोट सेवितां न धाये । भूक भुकेलीच राहे । तुका म्हणे पाहे। कोण वास मुक्तीची ।।3।।

अर्थात ‘तेथेच सुखाची वस्ती आहे जेथे हरिभक्त वैष्णव आनंदाने हरिनाम गातात व त्या छंदात नाचतात. तेथे दिंड्या असतात, गऊड चिन्हांकित पताका झळकत असतात आणि हरी नामाची गर्जना होत असते. यामुळे दोषाला त्याठिकाणी उपरती आली आहे आणि ह्यामुळे दोष चारी दिशेला पळत सुटले आहेत. पंढरपुरात दोष परत माघारी येत नाहीत आणि परत माघारी येण्याकरता शिल्लकही रहात नाहीत. हा पंढरीचा राणा आपला देवपणा विसरून वैष्णवांच्या मेळ्यात कायम उभा असतो. निर्गुण स्वरूपाला त्यागून देवाने वैष्णवांकरिता सुंदर गोजिरे ऊप धारण केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या सुंदर गोजिऱ्या स्वरूपाला कितीही पाहिले तरी पोट भरत नाही. या पांडुरंगाच्या सुंदर स्वरूपाला पाहण्याची भूक कायम राहते इतके ते आकर्षक आहेत आणि सुंदर गोजिरे स्वरूप पाहिल्यानंतर मग कोणाला मुक्तीची आवड कशाला वाटेल.’

अशा या पंढरीचा महिमा दिव्य आहे कारण हे पंढरपूर धाम या भौतिक जगात असले तरी हरिभक्तांना वैकुंठाचा अनुभव देते. अशा वैकुंठ वातावरणाचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात धन्य ती पंढरी धन्य भीमातीर । आणियेलें सार पुंडलिकें ।।1।।धन्य तो हि लोक अवघा दैवांचा। सुकाळ प्रेमाचा घरोघरिं ।।ध्रु.।।धन्य ते ही भूमी धन्य तऊवर । धन्य ते सुरवर तीर्थरूप ।।2।।धन्य त्या नर नारी मुखीं नाम ध्यान । आनंदें भवन गर्जतसे।।3।।धन्य पशु पक्षी कीटक पाषाण । अवघा नारायण अवतरला ।।4।।तुका म्हणे धन्य संसार ती आलीं । हरीरंगीं रंगलीं सर्वभावें ।।5।। अर्थात ‘सर्व वेद, शास्त्रांचे सार असा जो पांडुरंग त्याला पुंडलिकाने पंढरीत आणले आहे म्हणून ती पंढरी धन्य आहे व ते भीमातीरही धन्य आहे. त्या ठिकाणी राहणारे लोकही धन्य आहेत कारण विठ्ठलाच्या दारामध्ये राहणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या घरी भक्ती प्रेमाचा सुकाळ आहे. येथील भूमी धन्य आहे. तेथील झाडेझुडपे धन्य आहेत आणि तीर्थरूप सरोवरही धन्य आहे. त्या पंढरीतील नर नारी धन्य आहेत कारण त्यांच्या मुखामध्ये नेहमी विठ्ठलाचे नाम व चित्तामध्ये त्याचेच ध्यान आहे त्यामुळे हे पंढरी क्षेत्र, पंढरी भुवन विठ्ठलाच्या आनंदाने व नामाने गर्जून गेले आहे. त्या पंढरीतील पशुपक्षी, कीटक, पाषाणदेखील धन्य आहेत कारण या सर्वांसाठीच नारायणाने तेथे अवतार घेतला आहे. तुकाराम महाराज म्हणतात या संसारात जन्माला येऊन जे सर्व भाविक हरी रंगात रंगले ते खरोखरच धन्य आहेत.

-वृंदावनदास

Advertisement
Tags :

.