For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सामान्य माणसासाठी कर्मयोग सोयीचा आहे

06:17 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
सामान्य माणसासाठी कर्मयोग सोयीचा आहे
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

पहिल्या अध्यायात आपण बाप्पांनी सांगितलेला संख्यायोग किंवा ज्ञानयोग अभ्यासला. दुसऱ्या अध्यायात कर्मयोगाचं महत्त्व बाप्पांनी आपल्याला समजाऊन सांगितलं. तिसऱ्या अध्यायात वरील दोन्ही योग साधण्याच्या पद्धतीबद्दल बाप्पांनी मार्गदर्शन केलं. या अध्यायात सांख्य व कर्मयोगाची सांगड कशी घालायची याची माहिती बाप्पा देत आहेत.

सांख्ययोग किंवा ज्ञानयोग आणि कर्मयोग हे ईश्वरप्राप्तीचे दोन मार्ग आहेत. त्यापैकी ज्ञानयोगाने ज्याला हा प्रवास करायचा आहे त्याने ईश्वराशिवाय मी कुणाला जाणत नाही ह्या ठाम विचाराने इतर सर्व बंधने तोडून टाकायची असतात. तसे करण्याचे धैर्य येण्यासाठी सर्व विश्व ईश्वरव्याप्त असून समोर दिसणारे जग मिथ्या म्हणजे नाशवंत असल्याने खोटे आहे अशी पक्की धारणा व्हायला हवी. त्यासाठी सर्व इच्छा आणि अपेक्षांचा त्याग करता यायला हवा. हा मार्ग श्रेष्ठ प्रतीच्या योग्यांचा असून सामान्य माणसावर मायेचे पांघरूण असल्याने त्याला समोर दिसणारे जग मिथ्या आहे ही कल्पना सहजी पटण्यासारखी नसते म्हणून त्याने त्या वाटेने जाण्याचे टाळावे. मग सामान्य माणसाचा मार्ग कोणता? तर त्याने आपल्या वाट्याला आलेले काम हे ईश्वराने आपल्याला नेमून दिलेले आहे हे लक्षात घेऊन ते निरपेक्षतेने करायला सुरवात करावी. अर्थात निरपेक्ष होणे हे सुद्धा सोपे नसल्याने ते एकाएकी घडून येत नाही. म्हणून सुरवातीला कर्म केल्यावर आपल्याला काय हवं ते फळ देवाकडे मागावे कारण देणारा तोच आहे. मागितलेलं फळ आपल्या हिताचे असेल तर तो देईल. जर त्याने त्याप्रमाणे दिले नाही तर निराश न होता मागितलेलं फळ आपल्या हिताचे नाही हे लक्षात घेऊन पुढील कार्याला लागावे. अशा पद्धतीने कर्म करत गेल्यावर पुढे पुढे असे लक्षात येते की, आपण मागितलेले किंवा देवाने त्याच्या मर्जीने दिलेले फळ कायम टिकणारे नाही. असेच जर आहे तर मग फळाची अपेक्षा कराच कशाला ह्या विचारातून निरपेक्षतेने कर्म घडू लागते. हळूहळू स्वभावात फरक पडायला लागतो. कर्म हे निरपेक्षतेनेच करायचे असते अशी ठाम समजूत होऊन त्यानुसार स्वभावात बदल झाल्याने आपल्या वाट्याला आलेले कर्म निरपेक्षतेने करायचे आहे हे लक्षात ठेवावे लागत नाही. कर्म आपोआपच निरपेक्षतेने होऊ लागते. एकदा ही सवय लागली की त्याचे संन्याशात रुपांतर होते. संन्यासी नेहमीच निरपेक्षतेने कर्म करत असतो. कोणतीही गोष्ट असली तर असुदेत, नसली तरी चालेल असे त्याला वाटत असते. आजूबाजूच्या लोकांच्या वागण्याबोलण्याचा त्याच्या मनावर कोणताही परिणाम होत नाही कारण त्याला त्यांच्याकडून कोणतीच अपेक्षा नसते. अशा पद्धतीने जीवन जगत असताना त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि अंती तो ईश्वराशी एकरूप होतो. सामान्य माणसासाठी अशा पद्धतीचा मोक्षाप्रती नेणारा सोपा आणि त्याला सहज आचरता येणारा मार्ग बाप्पा ह्या अध्यायात विशद करून सांगणार आहेत. अशा पद्धतीने कर्म करणारा मनुष्य कर्माच्या सुरवातीपासून आनंदात असतो आणि त्यामुळे तो करत असलेले कर्म तो कौशल्याने करू शकतो.

Advertisement

ज्ञान आणि कर्म ह्या दोन्ही मार्गांची माहिती बाप्पांनी वरेण्यराजाला दिल्यावर आपण कोणत्या मार्गाने जावे हे न कळल्याने तो गोंधळून गेला आणि त्याने बाप्पांना योग्य मार्ग दाखवण्याची विनंती केली. येथून अध्यायाची सुरवात होते.

संन्यस्तिश्चैव योगश्च कर्मणां वर्ण्यते त्वया ।

उभयोर्निश्चितं त्वेकं श्रेयो यद्वद मे प्रभो ।। 1 ।।

अर्थ- वरेण्य म्हणाला, हे प्रभो, कर्मांचा संन्यास आणि कर्मांचा योग या दोहोचे तू वर्णन केलेस. या दोहोंपैकी जो निश्चित श्रेयस्कर असेल तो मला सांग.

क्रमश:

Advertisement
Tags :

.