For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

होय, महिन्याला 400 रुपयांत संसार करणाऱ्या स्मिता ताई

10:52 AM Jan 18, 2025 IST | Radhika Patil
होय  महिन्याला 400 रुपयांत संसार करणाऱ्या स्मिता ताई
Advertisement

कोल्हापूर / सुधाकर काशीद : 

Advertisement

समजा, ‘महिन्याभरात फक्त चारशे रुपयांत कुटुंब चालवणारी मला बायको पाहिजे,ढीगभर साड्या कपाटात न ठेवता गरजेपुरत्या दोन-तीन साड्याच घरात असल्या पाहिजेत, कोठेही जायचे असेल तर चालतच काखेला पिशवी मारून जावे लागेल,’ अशा अटी आता आपल्या लग्नासाठी एखाद्या इच्छुकांने घातल्या तर काय होईल? उत्तर अगदी साधे सोपे आहे. लग्नासाठी त्याला कधीच बायको मिळणार नाही. पण 40 वर्षांपूर्वी अशी अट घातलेल्या डॉ. रवींद्र कोल्हे यांच्याशी लग्न करण्यास एक साधीसुधी नव्हे, किंवा कोठे लग्न ठरत नाही म्हणून नव्हे तर एक चांगली सुशिक्षित मुलगी तयार झाली आणि आपले असे साधेसुधे कुटुंब चालवताना मेळघाटात प्रत्येक आदिवासी कुटुंबाचा ती आज घटक बनून गेली.

कोण आहे ही साधीसुधी पण एवढ्या ताकतीची बाई? या बाई आहेत डॉ. स्मिता मांजरे. या नागपूरच्या सुस्थापित कुटुंबातल्या. बी.. झाल्या, एल.एल.बी. झाल्या. नवीन शिकायची इच्छा, त्यामुळे होमिओपॅथी डॉक्टर झाल्या. छात्र युवा संघर्ष वाहिनीचे काम करत राहिल्या. दवाखानाही चांगला चालत राहिला. त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आणि त्यांच्या नजरेस डॉ. रवींद्र कोल्हे या ध्येयवेड्या डॉक्टरांची वधु पाहिजे, ही इच्छा कानावर आली. या रवींद्र कोल्हे डॉक्टरांची इच्छा अशी की, त्यांना भावी वधू अगदी साध्या राहण्याची हवी होती. लग्नासाठी फक्त रजिस्टर कोर्ट तिकिटाचा खर्च, 400 रुपये महिना उत्पन्न आणि दुचाकी नव्हे तर चालत जायची तयारी असलेली बायको त्यांना हवी होती आणि स्मिताताईंनी लग्न करायचे तर अशा तरुणाशीच अशी मनाची तयारी केली.

Advertisement

दोन्ही कुटुंबांच्या संमतीने 2 डिसेंबर 1988 रोजी त्यांचा विवाह झाला. स्मिताताई टूर वगैरे सारे विसरून डॉ. रवींद्र कोल्हे यांच्यासोबत मेळघाटातील बैरागडच्या दिशेने गेल्या. तेथे त्यांचा गृहप्रवेशच एका झोपडीवजा घरात आणि घर कम दवाखान्यात झाला. तेथे डॉक्टर फक्त एक रुपयात उपचार करायचे. आसपासच्या भागात जंगल, छोट्या-छोट्या वस्त्या, आदिवासींची गावे, कुपोषण संसर्गाचे आजार त्यामुळे रुग्णांची संख्या जास्त होती. महिन्याला चारशे रुग्ण यायचे. त्यांची प्रत्येकी एक रुपयाच फी ते घ्यायचे. त्यामुळे चारशे रुपये त्यांना मिळायचे. एम.बी.बी.एस., एम.डी. डॉक्टर कोल्हे शहरात राहून खोऱ्याने पैसा ओढू शकले असते. पण त्यांनी स्वत:ला वेगळ्dया सेवेत वाहून घेतले.

अशा डॉक्टर कोल्हेंसोबत स्मिताताई बैरागड या अतिदुर्गम भागात संसार आणि आसपासच्या आदिवासी क्षेत्रात सामाजिक काम करू लागल्या. अंगावर एकही दागिना नाही. हातमागावरच्या साडीशिवाय दुसरी साडी नाही. फोन नाही. घरात एक, बाहेर एक बेडरूममध्ये एक, ‘बाथरूम’मध्ये एक, सभा-समारंभासाठी एक असा चपलांच्या जोडीचा दारात ढीग नाही. गळ्dयात पाच कप्प्याची पर्स नाही. ‘सब कुछ पैदल’ अशा पद्धतीने त्या राहू लागल्या. चमचमीत खाण;-पिणे विसरूनच गेल्या. आदिवासींच्या अडचणी ऐकून आणि पाहून स्तब्ध होत गेल्या आणि पुन्हा तेवढ्याच ताकतीने मदतीसाठी त्या बाहेर पडू लागल्या.

कुपोषण हे इथले मुख्य संकट आहे, हे जाणून त्या स्वस्त धान्य दुकानाच्या परवान्यासाठी तालुका कार्यालयात येरझारा घालू लागल्या. आजपर्यंत त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना का? असा प्रतिप्रश्न कोणाचेही विचारायचे धाडस नव्हते. पण स्मिताताई प्रत्येक अडचणीच्या प्रसंगात कमरेला पदर खोचून अधिकाऱ्र्यांना जाब विचारू लागल्या. पुढे अधिकारी, कर्मचारीही स्मिताताईंचे हे नि:स्वार्थी काम पाहून त्यांना मदत करू लागले. डॉ. कोल्हे यांची त्यांना पूर्ण साथ राहिली. कारण त्यांना अपेक्षित अशी केवळ साधीसुधी नव्हे तर त्याही पुढच्या नि:स्वार्थी भावनेची जगासाठी झटणारी बायको मिळाली होती. स्मिताताई गावच्या उपसरपंच झाल्या. त्यांनी हक्काने साऱ्या शासकीय योजना आपल्याच गावात नव्हे तर आपल्या परिसरातील सर्व गावांत ताकतीने ओढून आणल्या. त्यांच्या प्रयत्नामुळे बैरागडमध्ये पहिल्यांदा लाईट आली. लोकांच्या आयुष्यातला काळोख दूर होण्यास सुरुवात झाली.

स्मिताताईंच्या या कामाची दखल राज्य, केंद्र शासनाने घेतली आणि पद्मश्री पुरस्काराची माळ ताईंच्या गळ्यात पडली. आता सामाजिक काम म्हणजे डिजिटल बोर्ड, वाढदिवस, गळ्dयात जनावरासारख्या सोनसाखळ्या घालून भलेमोठे चौका चौकात फोटो अशी परिस्थिती झाली आहे. पण स्मिताताईंना पद्मश्री मिळाली तरी त्यांनी कधी एकही फलक लावला नाही. उद्या, या ताई कोल्हापुरात येत आहेत. त्यांना ताराराणी विद्यापीठाच्यावतीने भद्रकाली ताराराणी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सकाळी साडेदहा वाजता ताराराणी विद्यापीठात हा अनोखा समारंभ होणार आहे. ताराराणी या नावाचे तेज या पुरस्कारामुळे आणखीन लखलखणार आहे. कोल्हापूरकर आपण नको त्यांच्या वाढदिवसाला गर्दी करतो. कोण दखलही घेत नाही. पण सोबत पुष्पगुच्छ त्या गर्दीत जातो. उद्या मात्र एक अनोखा समारंभ आहे. स्मिताताई या समारंभाच्या प्रमुख आकर्षण आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला आपण सर्वांनीच उपस्थित राहण्याची गरज आहे. कारण एवढी साधीसुधी पण जिगरबाज ताई बघायचे भाग्य आपल्याला मिळणार आहे.

Advertisement
Tags :

.