होय, माझीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा!
ज्येष्ठ नेते आर. व्ही. देशपांडे यांनी म्हैसूर येथे पत्रकारांच्या प्रश्नाला दिले उत्तर
प्रतिनिधी/ बेंगळूर
सत्ताधारी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांमध्ये आणखी एका नेत्याची भर पडली आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते आर. व्ही. देशपांडे यांनी देखील मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे. म्हैसूर येथे कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असता पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, मी यापूर्वी मंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. हायकमांडने यासाठी परवानगी दिली तर सिद्धरामय्यांनी अनुमती द्यावी. मात्र, सध्या मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील अलीकडच्या राजकीय घडामोडींनंतर मुख्यमंत्र्यांमध्ये बदल होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना आर. व्ही. देशपांडे यांनी, मी अनेक वर्षे मंत्री म्हणून काम केले आहे. आता मुख्यमंत्री व्हायला आवडेल. मलाही मुख्यमंत्री होण्याची खूप इच्छा आहे. मी सिद्धरामय्या यांच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. हायकमांडने परवानगी दिली तरी सिद्धरामय्या यांनी अनुमती द्यावी. मात्र, सध्या मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच नाही. तसेच याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मी आणि सिद्धरामय्या चांगले मित्र आहोत, असे सांगत त्यांनी हसत उत्तर दिले.
मुडाबाबत कागदपत्रे दिल्यास सरकारला पत्र लिहीन
गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर आणि मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या घरी झालेली बैठक केवळ त्यांच्या खात्याशी संबंधित होती. याला राजकीय रंग नको. मुडा प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी कोणतीही चुकीचे केले नाही. हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचे भाजपचे म्हणणे आहे. मात्र, आरोपाबाबत कागदपत्र दिल्यास सरकारला पत्र लिहीन, असे आव्हान आर. व्ही. देशपांडे यांनी आव्हान दिले.
आता मूल्याधारित राजकारण नाही
मुख्यमंत्री असताना रामकृष्ण हेगडे यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप होता. त्यामुळे त्यांनी लगेच राजीनामा दिला. फोन टॅपिंग आता दररोज सुरू आहे. मात्र, आता मूल्याधारित राजकारण होत नाही. राजकारणी पूर्वी मूल्यावर आधारित राजकारण करत असत, असेही आर. व्ही. देशपांडे म्हणाले.
गॅरंटी योजनेतून आर्थिक बोजा
गॅरंटी योजनांमुळे सरकारवर आर्थिक बोजा झाल्याचे खरे आहे. पाच गॅरंटी योजनांसाठी 50-60 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे अन्य विकासाला खीळ बसणे स्वाभाविक आहे. मात्र, त्याची भरपाई सरकार करत आहे. गॅरंटी योजना हे भाववाढीचे कारण नाही. देशातच किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत, असेQQQQQQ त्यांनी सांगितले.