अवजड वाहनांना बजावलेली अनमोड मार्गावरील 40 ची वेगमर्यादा कागदावरच
कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी
वार्ताहर/रामनगर
अनमोड मार्गाचे काम अर्धवट स्थितीतच असल्याने अनमोडमार्गे अनेक काळ अवजड वाहनांना कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी बंदचा आदेश दिला होता. परंतु तीन महिन्यापूर्वी अनमोडमार्गे अवजड वाहनांना 40 स्पीड लिमिटने जाण्यास कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी ना हरकत देत पोलीस तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांना अवजड वाहनांना सोडण्याबाबत निविदा जारी करण्यात आली. आता यामार्गे मोठ्या प्रमाणात अवजड वाहने धावू लागली आहेत. परंतु एकही अवजड वाहनधारकांकडून 40 स्पीडने देण्यात आलेली परवानगी पाळण्यात येत नाही. बहुतेकदा अनेक अवजड वाहनधारक इतर छोट्या मोठ्या वाहनांची पर्वा न करता या मार्गावरून सुसाट धावत असल्याने छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे. तर एखाद्या दुचाकीस्वाराला दहा, बारा, सोळा, चाकी अवजड वाहन समोरून सुसाट येताना पाहून जणू आपला काळच येत आहेत का, असा प्रश्न पडत आहे.
मद्यपान करणाऱ्यांची तपासणी आवश्यक
कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी 40 स्पीडची अट घातली. परंतु स्पीड लिमिट पाहण्याची सोय या ठिकाणी आहे का? अथवा उपलब्ध होईल का याची पडताळणीही केली नाही. याचबरोबर गोवा येथून कर्नाटकात अनमोडमार्गे येताना अनेक वाहनधारक मद्यपान करून येतात. तर गोव्यातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनचालकांना मद्यपान केल्याची तपासणी अधूनमधून करणे गरजेचे आहे. त्यामुळे थोडेतरी अपघात टळू शकतील. अनेक अवजड वाहनधारक येथील संबंधित अधिकाऱ्यांना मासिक हप्ता ठरवून क्षमतेपेक्षा जास्त माल भरणे, सर्व नियम धाब्यावर बसवून वाहने चालवणे असे प्रकार वाढत चालले आहेत. मोठा अपघात होऊन एखाद्याचा जीव जाण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यानी वेळीच लक्ष देऊन अवजड वाहनधारकांना नियमांचे पालन करत वेगावरील नियंत्रण ठेवण्यास सांगण्याची मागणी छोट्या वाहनधारकांतून करण्यात येत आहे.