महामेळाव्याला मोठ्या संख्येने हजर राहण्याचा येळ्ळूर म. ए. समितीचा एकमुखी निर्णय
वार्ताहर/येळ्ळूर
महाराष्ट्र सरकारने 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला सुप्रीम कोर्टात दाखल केल्याने 2006 पासून कर्नाटक सरकार बेळगावमध्ये अधिवेशन घेऊन बेळगाववर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला विरोध करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने प्रत्येक वर्षी मेळावा घेत त्याला विरोध करीत असतात. या वर्षीही हा मेळावा 8 डिसेंबर रोजी होणार असून, या मेळाव्याल मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी एपीएमसी सदस्य वामन पाटील होते.
प्रकाश अष्टेकर यानी महामेळाव्यासंदर्भात कार्यकर्त्यांना माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये कार्यकर्त्यांच्या विचारानुसार विभागवार बैठका घेऊन नूतन कार्यकारिणी करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. यावेळी वामन पाटील यानी मराठी माणसांच्या हितासाठी आणि सीमाप्रश्नासाठी ज्या ज्या वेळी मध्यवर्ती समितीने संघर्ष केला त्या त्या वेळी संघर्षात येळळूर गाव नेहमीच अग्रेसर राहिला आहे. यावेळीही या महामेळाव्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मेळावा यशस्वी करूया असे आवाहन त्यानी केले.
यावेळी माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दद्दाप्पा बागेवाडी, युवा नेते दत्ता उघाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजू पावले, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष भोला पाखरे, मार्केटिंग सोसायटीचे संचालक प्रदीप देसाई, उदय जाधव, ग्रामीण साहित्य संघाचे अध्यक्ष नागेश बोबाटे यानीही आपले विचार मांडले. बैठकीला माजी तालुका पंचायत सदस्य चांगदेव परीट, ग्राम पंचायत सदस्य राकेश परीट, सदस्या अनुसया परीट, रुपा पुण्याण्णवर, वनिता परीट, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण पाटील, सतिश देसूरकर, कृष्णा शहापूरकर, सुरज गोरल, भीमराव पुण्याण्णवर, नाथाजी कदम, दौलत पाटील, रमेश धामणेकर, बाळकृष्ण धामणेकर यांच्यासह कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमेश पाटील यानी उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानले.